मुंबई - राज्यात दिवसभरात आज (सोमवारी) ७ हजार ८९ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर त्याच्या दुप्पट म्हणजे १५ हजार ६५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ टक्के इतके झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख १२ हजार ४३९ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यातील आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमुन्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमुने म्हणजेच १९.९४ टक्के पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात २३ लाख २३ हजार ७९१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज (सोमवारी) १६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४० हजार ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के इतका आहे.
सोमवारी नोंद झालेल्या एकूण १६५ मृत्यूंपैकी १०० मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २१ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
हे ४४ मृत्यू पुढीलप्रमाणे - ठाणे -१२, पुणे -७, रत्नागिरी -७, नागपूर -५, सांगली -४, गडचिरोली -३, अमरावती -२, बुलढाणा -२, नांदेड -१ आणि कर्नाटक -१.