पाचशेहून अधिक शिक्षक कोरोनाग्रस्त; अनेक शिक्षकांचे अहवाल अद्यापही बाकी - मुख्याध्यापक संघटना बातमी
पाचशेहून अधिक शिक्षक कोरोनाग्रस्त आहे. तर, राज्यातील ५० हजाराहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी याच्या कोरोना चाचणीचे अहवाल अजूनही मिळाले नाही. त्यामुळे सोमवारी शाळा सुरू कशी करायची, असा प्रश्न मुख्याध्यापक संघटनेने विचारला आहे.
मुंबई - मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि प्रमुख शहरांचा अपवाद वगळता राज्यात शाळा सुरू होत असून तब्बल पाचशेहून अधिक शिक्षक कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. मुंबईसह राज्यातील ५० हजाराहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी याच्या कोरोना चाचणीचे अहवाल अजूनही मिळाले नसल्याने आम्ही सोमवारी शाळा सुरू कशी करायची, असा प्रश्न मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही करायचे काय-
सोमवारी सुरू होत असलेल्या शाळांवर महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, दुसरीकडे शाळा सुरू करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर लादण्यात आल्याने त्याविषयी ही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकवाक्यता नसल्याने आम्ही शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थांनी काय करायचे, असा प्रश्नही रेडीज यांनी उपस्थित केला.
..तर सरकार आणि शिक्षण विभागातील अधिकारी जबाबदार राहतील-
कोरोनाची दुसरी लाट राज्यात येण्याच्या मार्गावर असून मागील दोन दिवसांत मुंबईसह राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात उद्या शाळा सुरू होत असल्याने शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उद्या शाळा सुरू होणार नसल्या, तरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या या उपस्थितीमुळे काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली. तर, याला सरकार आणि शिक्षण विभागातील अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी दिला आहे.
सरकारमध्ये समन्वयाचा अभाव-
राज्यातील एकूणच परिस्थिती पाहून येत्या काळात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे विधान उपमख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना केले. तर, दुसरीकडे अशीच भूमिका शिक्षण राज्यमंत्री बचू कडू यांनी जाहीर केली. कोरोनची दुसरी लाट आली, तर शाळा सुरू करण्याचा फेरविचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भूमिका ही कायम आडमुठी राहिल्याने याविषयी पालकांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे.