मुंबई - कोकणात हर्णे, मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, मराठवाड्यात औरंगाबाद, विदर्भात गोंदियापर्यंत आज नैऋत्य मोसमी पावसाची घोडदौड सुरू झाली आहे. येत्या २४ तासात महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस सक्रिय होईल. आजच्या नोंदीनुसार, रत्नागिरीत एक ते दोन ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडला आहे. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठावाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूत्ते यांनी दिली.
हवामानाचा अंदाज-
१३ ते १४ जून: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१५ जून: कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१६ जून: कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१७ जूनः कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
हवामान खात्याचा इशारा..
१४ जून: विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. गोवा - महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
१५-१६ जून: कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. गोवा - महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
१७ जून: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गोवा - महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
मुंबईसाठी अंदाज
14 जून: संध्याकाळी, रात्री आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
15 जून: आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.