मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रमुख नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षांमध्ये विविध कारणांनी नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे 'नॉट रिचेबल' होण्याबरोबरच भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणि दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळेस पक्षाला एकसंघ ठेवायचे असेल आणि आगामी निवडणुकांसाठी एकत्रितपणे समोर जायचे असेल तर काहीतरी बदल घडवून गरजेचे होते. म्हणूनच शरद पवारांनी राजीनामा देण्यापूर्वी जाहीर सभेत भाकरी फिरवायला हवी असे विधान केले होते. आपण राजीनामा दिल्यानंतर पक्षाची सूत्रे अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवली जातील. त्यामुळे पक्षांमधील वातावरण पुन्हा चैतन्याने भरले जाऊन पक्ष फुटण्यापासून वाचेल अशी अपेक्षा शरद पवार यांना होती.
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात स्पर्धा: मात्र शरद पवार यांच्यानंतर पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळेल असे नेतृत्व पक्षाकडे आज तरी दिसत नाही. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि जयंत पाटील या नेत्यांची नावे समोर येत असली तरीही त्यांच्या कार्यपद्धतीच्या काही मर्यादा आहेत. राष्ट्रीय स्तरावर त्यांना किती महत्त्व मिळेल आणि पक्षाला किती विस्तार करता येईल याबाबत निश्चितच शंका होती. त्यामुळे शरद पवारांचे उत्तर अधिकारी म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याच नावावर जोरदार चर्चा झाली; मात्र शरद पवार यांचे समर्थक आमदार पक्षांमध्ये आहेत तसेच सुप्रिया सुळे यांचा सुद्धा एक गट पक्षात कार्यरत आहे. यापैकी कुणाही एका व्यक्तीला जर पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा मिळाली असती तर दुसरी व्यक्ती नाराज होऊन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर तसाच राहिला असता अशीही शक्यता होती.
पवारांनी काय साध्य केले? काय गमावले? शरद पवार यांनी राजीनामा देऊन पक्ष संघटित ठेवणे आणि नव्या पिढीच्या हातात देणे यासाठी आपण तयार असल्याचे सांगून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उमेद जागवण्याचे काम केले. मात्र, शरद पवार यांच्यानंतर पक्षात यादवी माजली असती तसेच दुसऱ्या फळीचा नेता सक्षमपणे पक्ष सांभाळू शकला असता, याबद्दल खात्री नव्हती. म्हणूनच कार्यकर्ते आणि नेते यांनी शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी गळ घातली. यामुळे शरद पवार यांनी पक्षात असलेली आपली उपयुक्तता आणि राष्ट्रीय स्तरावर असलेली गरज ही जरी दाखवून दिली असली तरी पक्षाकडे दुसर नेतृत्व नाही आणि दुसऱ्या कुठल्याही नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास नाही हे समोर आल्याने पक्ष अजूनही विस्कळीत किंवा फुटीच्या उंबरठयावर आहे. हे निश्चितच स्पष्ट होत आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पांडुरंग मस्के यांनी व्यक्त केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चैतन्य जागवण्यासाठी हा डाव होता का? अजूनही पक्षात शरद पवार यांचा शब्द चालतो आणि प्रमाण आहे हे दाखवण्यासाठी किंवा अजित पवार यांना वेसण घालण्यासाठी हा डाव खेळला गेला का? अशी चर्चाही सुरू असल्याचे मस्के यांनी सांगितले.
अजित पवारांची नाराजी कायम? पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी मानले जाणारे नेते अजित पवार यांची नाराजी मात्र आता कायम राहणार आहे. वास्तविक शरद पवारांनी राजकारणातून काहीसे बाजूला व्हावे आणि पदावरून निवृत्ती घ्यावी असा कौटुंबिक निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अजित पवार हे पक्षातच राहण्याच्या मनस्थितीत असताना पुन्हा एकदा त्यांची नाराजी कायम राहणार असल्याची चर्चा आहे.
शरद पवार मोठे अभिनेते: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड हे मोठे अभिनेते आहे असे आम्ही आजवर मानत होतो. मात्र गेल्या काही दिवसात शरद पवार यांनी अतिशय स्क्रिप्टेड डाव खेळला. त्याप्रमाणे त्यांनी अभिनय केला आणि आधीच ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा मागे घेतला अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केली आहे.
हेही वाचा: Uddhav Thackeray Vs Nitesh Rane : मुंबईतील गुंड घेऊन उद्धव ठाकरे बारसूत जाणार, नितेश राणे यांचा आरोप