मुंबई - राज्यात कितीतरी बँका मराठीचा वापर करत नाहीत. त्यांनी व्यवहारांमध्ये मराठीचा वापर केला पाहिजे, अशा सूचना सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत. तरीही मराठीचा वापर बँकांमध्ये होत नाही, याबाबत मनसे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी खंत व्यक्त केली आहे.
याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, अमेझॅान तर परदेशी कंपनी आहे. परंतु, आपल्याच कितीतरी बँकां मराठीचा वापर करत नाहीत, असे दिसते. वास्तविक मराठीचा वापर केला पाहिजे, अशा सूचना सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत. ह्यासंदर्भातही बँकांशी पाठपुरावा केला पाहिजे. ट्विटसोबत त्यांनी रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकाना पाठवलेल्या पत्राचा फोटोही शेअर केला आहे. हे पत्र २८ नोव्हेंबर २००७ रोजी रिझर्व्ह बँकेकडून पाठवण्यात आले आहे.
![मनसे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी शेअर केलेले रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10027539_fd.jpg)
ई-कॉमर्स कंपन्या वठणीवर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) विविध कार्यालयांमध्ये अधिकृतपणे मराठीच्या वापरासाठीचा मुद्दा लावून धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोडोंची कमाई करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मराठीचाही वापर करावा म्हणून मनसेकडून अॅमेझॉनसारख्या कंपन्यांवर दबाव आणला गेला होता. त्यानंतर अॅमेझॉनसह इतर काही कंपन्यांनी मराठी वापर करण्याचे मान्य करून लवकरच सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.