मुंबई - एफएम वाहिन्यांवर पाकिस्तानी गायकांची गाणी वाजवणे बंद करा, असा दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने १४ फेब्रुवारीला हल्ला केला होता. त्या पार्श्वभूमीवर मनसेने पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. याआधी संगीत कंपन्यांनाही त्यांनी पाकिस्तानी गायकांना संधी न देण्याबद्दल सांगितले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या शालिनी ठाकरे यांनी एफएम वाहिन्यांना यासंबंधी एक पत्र पाठवले आहे. त्यात त्या म्हणाल्या, “शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड घेण्यासाठी एक देश म्हणून आपण सर्व भारतीय वचनबद्ध आहोत. आपल्या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर मात्र अत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानी गायक - संगीतकारांची गाणी वाजवली जात आहेत.
पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र आपल्या देशाविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहे. भारत-पाक सीमेवर अत्यंत तणावाचे वातावरण आहे. तसेच, या दोन देशांमध्ये कधीही युद्धाचा भडका उडेल अशी नाजूक स्थिती असताना आपली रेडिओ वाहिनी मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी करोडो भारतीयांना ऐकवत आहे.
संगीत ऐकणाऱयांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते हे खरे आहे. तरी सध्याच्या संवेदनशील स्थितीत पाकिस्तानी गायक - संगीतकारांची गाणी मात्र देशवासीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण करत आहेत. म्हणूनच रेडिओ वाहिन्यांवर पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी वाजवली जाऊ नयेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.”
भारतीयांच्या भावनांचा आपण आदर कराल याची खात्री आहेच. अन्यथा आपल्या रेडिओ वाहिनीवरून वाजवली जाणारी पाकिस्तानी गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’ कसा करायचा, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाऊक आहेच, असा धमकीवजा इशाराच शालिनी ठाकरे यांनी पत्राद्वारे सर्व एफएम रेडिओ वाहिन्यांच्या संचालकांना आणि कार्यक्रम प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे.