मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले आहेत. मागचे काही दिवस संदीप देशपांडे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वीरप्पन गँगचा जो काही भ्रष्ट कारभार उघड करत होते त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक आरोप केले आहेत.
म्हणून माझ्यावर हल्ला: संदीप देशपांडे यांनी दादर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. शिवाजी पार्क गेट नंबर पाच जवळ माझ्यावर हल्ला झाला. आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्हाला संरक्षणाची गरज नाही. हल्ल्यामागे कोण हे मला माहिती आहे. मी जो काही पालिकेतील भ्रष्टाचार मागील काही दिवस उघड करत होतो त्यामुळेच कदाचित हल्ला झाला असावा. वीरप्पन गॅंगने कोरोना काळात जो काही घोटाळा केला तो घोटाळा मी येत्या काही दिवसांत उघड करणार होतो म्हणून हल्ला करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले देशपांडे?: संदिप देशपांडे पत्रकार परिषदेत म्हणाले की, येत्या काही दिवसात मी एक पत्रकार परिषद घेऊन वीरप्पन गॅंगने कोरोना काळात केलेला आणखी एक घोटाळा जनतेसमोर आणणार होतो. त्या घोटाळ्या संदर्भातील पत्र मी आयुक्तांना दिले आहे. आमचे नेते राज ठाकरे आधीच म्हणालेत राज्यात राजकारणाचा चिखल झाला आहे. हल्ल्याच्या 48 तास अगोदर बाळा कदमला अटक झाली. हा कोणाचा खास माणूस आहे हे तपासून पाहा. त्यामुळे पुढच्या काही दिवसात मी जो घोटाळा उघड करणार होतो तो आजच तुमच्यासमोर ठेवत आहे. या घोटाळ्यात वर्षभरात फक्त दहा लाख रुपये कमवणारा पालिकेचा कॉन्ट्रॅक्टर कोरोनानंतर करोडो रुपये कमवू लागला, असा आरोप त्यांनी केला आहे.
हा घोटाळा नाही का?: संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचारामागे कोणती वीरप्पन गॅंग आहे, हे आता मुंबईच्या जनतेला माहिती झाले आहे. पालिकेत कॉन्ट्रॅक्ट मिळणाऱ्या दोन कंपन्या आहेत. एक महावीर फर्निचर आणि दुसरी एक ग्रेस फर्निचर. या दोन कंपन्यांचा टर्नओव्हर कोविडच्या आधीपर्यंत दहा लाखाचा असल्याचे दिसून येते. आणि कोविड नंतर त्यांचा टर्नओव्हर करोडो रुपयांमध्ये गेला. हे कसे शक्य झाले? हा घोटाळा नाही का?, असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
पत्रकार परिषदेत मोठे आरोप: पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, या दोन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट कुठली मिळालेत हे देखील तुम्ही तपासून पाहा. ही जी कॉन्ट्रॅक्ट मिळाली आहेत ती कोविड सेंटर मध्ये बेडशीट पुरवणे, गाद्या पुरवणे आणि कॉट/बेड पुरवणे, अशा स्वरूपाचा आहे. ज्या कधीच पुरवल्या गेल्या नाहीत. नावावर सगळी बिले गेली. बरे त्यांनी पुरवले असतील असे आपण समजू. पण, एखादा कंत्राटदार एखादी गोष्ट पुरवत आहे. ती गोष्ट पुरवण्यासाठी एकतर ती त्या कंत्राटदाराकडे असावी लागते किंवा त्याला ती खरेदी करावी लागते. आता हा जो पालिकेतील कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे अशा प्रकारचे कोणतेही सामान नाही तरी देखील या कॉन्ट्रॅक्टरला हे कंत्राट मिळाले. या सर्व प्रकरणासंदर्भात मी पालिकेचे प्रशासक आयुक्त इकबालसिंह चहल यांना भेटलो आहे आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली असल्याचे देशपांडे म्हणाले.
ठाकरे गटावर निशाणा: संदिप देशपांडे म्हणाले की, आणखी एक बाब तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मागील काही दिवसात मी काही घोटाळे उघड केले. यात के एम हॉस्पिटल मधील पॉवर बॉक्सचा घोटाळा असेल किंवा फर्निचर घोटाळा असेल या सर्व घोटाळ्या संदर्भात मी इकबाल सिंह चौहल यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. माझ्या मागणीची दखल घेऊन त्यांनी चौकशीचे आदेश देखील दिले होते. मात्र, या सर्व घोटाळ्यांमध्ये जे कोणी आरोपी आहेत ते कोण आहेत? ते कुणाच्या जवळचे आहेत? हे तपासून घ्या. या सर्व कंत्राटदारांचे कोणासोबत फोटो आहेत याची देखील तुम्ही माहिती घेतली पाहिजे. हे सर्व तुम्हाला एकाच गटाच्या जवळचे कॉन्ट्रॅक्टर असल्याचे लक्षात येईल, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: Sandeep Deshpande : स्टंपने हल्ला करणाऱ्यांचा कोच कोण याची आम्हाला माहिती आहे - संदीप देशपांडे