मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. नाईट कर्फ्यू लावल्यानंतर राज्य सरकार टाळेबंदीची तयारी करत आहे, अशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला टाळेबंदीची तयारी करण्याची निर्देशही दिले होते. मात्र, याला मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी 'लॉकडाउन से डर नही लगता, गरिबी से डर लगता है', असे ट्विट केले आहे. टाळेबंदी करावी पण सामान्य व गरीब परिवाराला रोख वीस हजार रुपये द्यावे, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली आहे.
गरिबांना वीस हजार रुपये द्या त्यानंतर टाळेबंदी लावा
मागील वर्षभर आपण सर्वच जण अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जात आहोत. पण, खरी अडचण होते ती गरीब लोकांची, ज्यांना रोज काम केल्याशिवाय पर्याय नाही. जनतेने मागील वर्षात सरकारचे निर्देश कडकपणे पाळले. थाळ्या ही वाजवल्या व "कोमट पाणी" ही प्याले. पण, आपल्या राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढ झाली त्याचे गूढ उकलेना. बंगाल, तामिळनाडूमध्ये सर्व नियम पायदळी तुडवून लाखोंच्या प्रचार सभा सुरू आहेत. त्या ठिकाणी कोरोना कसा वाढत नाही? तसेच राज्यात उच्चभ्रू लोकांच्या पबमध्ये वारंवार सर्व नियमाचा फज्जा उडविला आणि टाळेबंदीचा मारा तर सर्वसामान्य जनतेला बसतो. आधीच लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. आता लोक हा आर्थिक ताण अजिबात सहन करू शकत नाही. सरकारने खुशाल टाळेबंदी करावे. पण, सामान्य व गरीब परिवाराला रोख वीस हजार रुपये द्यावे. त्यानंतर टाळेबंदी करावी, असे नांदगावकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शरद पवार यांच्यावर आज रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया