मुंबई - पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवा या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा निघणार आहे. आज मनसेचे नेते व सरचिटणीस यांची राजगड येथे बैठक पार पडली. या बैठकीत वीर जिजामाता उद्यान भायखळा ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा काढण्याचे ठरले आहे. या मोर्चासाठी मनसेच्या राजगड मुख्यालयातून पोलीस मुख्यालयात परवानगीसाठी पत्र पाठवण्यात आले आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याला व एनआरसीला विरोध दर्शवण्यासाठी मोहम्मद अली रोड या मुस्लिम बहुसंख्यक भागातील महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान दरम्यान काढण्यात येणाऱ्या मनसेच्या मोर्चाच्या मार्गात देखील हा भाग येतो. सीएए विरोधात अनेक मोर्चे निघाले आणि या मोर्चांमध्ये स्थानिक नागरिकांपेक्षा घुसखोर असलेल्या बाहेरच्या नागरिकांचा समावेश असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी महाअधिवेशनातील भाषणात केला होता. असे मोर्चे निघाल्यास मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले जाईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या महाअधिवेशनाच्या भाषणात म्हटले होते. तसेच मंगळवारी राज ठाकरे यांनी माझा विरोध हा बाहेरून आलेल्या घुसखोरांना आहे. सुधारित नागरिकत्व कायदा व एनआरसीला माझा पाठींबा नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले. त्यामुळे सदर परिस्थिती पाहता पोलीस विभाग व राज्य सरकार या मोर्चाला परवानगी देणार का याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.