मुंबई - संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व करणारे मराठी पत्रकार आणि समाज सुधारक केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांकडून प्रबोधकार ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन केले जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करून प्रबोधकारांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
...तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे
“जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे’ ही शिकवण आमचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची. ‘उक्ती आणि कृती’ यांचा उत्तम मेळ कसा असावा, हे आजोबांच्या आयुष्याकडे बघितले की लक्षात येते. लोकहितवादी, आगरकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समाज सुधारणांना पुढे नेणारे ते निडर समाजसुधारक होते. पाखंडी मानसिकता, अनिष्ट रूढी, जाती-व्यवस्था ह्या विरोधात दोन हात करण्यासाठी त्यांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही शस्त्रं वापरली,” असे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.