मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३चे कारशेड आरे जंगलातून कांजूर येथील मेट्रो-6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) कारशेडच्या जागेवर हलवण्यात आले आहे. आता या पाठोपाठ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मेट्रो-6 आणि मेट्रो-3 पाठोपाठ आता मेट्रो-4 अर्थात वडाळा-ठाणे-घाटकोपर-कासारवडवलीचे कारशेडही कंजूरमार्गच्या जागेवर उभारले जाणार आहे. त्यानुसार एमएमआरडीएने या जागेवर 'इंटिग्रेटेड मेट्रो कारडेपो ऍट कांजूरमार्ग लाइन-3, लाइन-6, लाइन-4' असा बोर्ड लावला आहे. या निर्णयामुळे मोघरपाडा येथील शेतकऱ्यांनी आणि पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
अगोदर 'येथे' होणार होते कारशेड -
मुंबई आणि ठाणे शहर मेट्रोने जोडण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो-4 प्रकल्प हाती घेतला आहे. वडाळ्यावरून हा मार्ग सुरू होऊन तो कासारवडवली येथे येऊन संपणार आहे. तर पुढे याचा विस्तार कासारवडवली ते गायमूख असा केला जाणार आहे. 32.32 किमी लांबीच्या आणि अंदाजे 15 हजार कोटी खर्चाच्या मेट्रो-4 मार्गासाठी ठाण्यातील मोघरपाडा येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या ठिकाणी कारशेड उभारण्यास शेतकऱ्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. अनेक शेतकऱ्यांच्या जागा या कामात जात असल्याने हा विरोध झाला. याचा वाद न्यायालयातही गेला. मोघरपाडा येथील कारशेड रद्द करत ते इतरत्र हलवण्याची शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींची मागणी होती.
...मग पुढे आला 'हा' पर्याय -
मेट्रो-4 चे कारशेड मोघरपाडा येथे उभारण्यास विरोध असताना दुसरा काही पर्याय नसल्याने एमएमआरडीएकडून ही मागणी डावलली जात होती. अशातच मागील महिन्यात मेट्रो-3 चे कारशेड कांजूर येथील मेट्रो-6 च्या जागेवर हलवण्यात आले. या जागेची पाहणी केली असता येथे मेट्रो-4चेही कारशेड होऊ शकते, असे म्हणत पर्यावरणप्रेमी-शेतकऱ्यांनी याच जागेवर कारशेड बांधण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत एमएमआरडीएने कांजूरमार्ग येथे कारशेड बांधण्याचा विचार सुरू केला होता.
अखेर लागला बोर्ड -
पर्यावरण प्रेमी-आदिवासी यांच्या मागणीचा विचार करत आणि एकाच ठिकाणी सर्व कारशेड असल्यास जागा, वेळ आणि पैसा वाचेल व व्यवस्थापन सोपे होईल, असे म्हणत अखेर मेट्रो-4 चे कारशेडही कांजूरलाच हलवले आहे. याचा अंतिम निर्णय झाला असून तसा बोर्डही आता कांजूर कारशेडच्या जागेवर लावण्यात आला आहे. याविषयी 'ईटीव्ही भारत'ने एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी बी जी पवार यांना विचारले असता त्यांनी असा बोर्ड लावण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दुजोऱ्यानुसार आता मेट्रो-4 चे कारशेड मोघरपाडाऐवजी कांजूर येथे होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
कांजूर बनले 'मेट्रो हब' -
आरेतील मेट्रो-3 चे कारशेड कांजूरमार्ग येथील जागेवर हलवण्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)चा आणि तत्कालीन फडणवीस सरकारचा विरोध होता. मात्र, त्यावेळी याच सरकारने मेट्रो 6-चे कारशेड याच कांजूरच्या जागेवर बांधण्यात परवानगी दिली होती. आता मात्र, ठाकरे सरकारने मेट्रो-3चेही कारशेड कांजूरमध्ये आणले आहे. तेव्हा आता मेट्रो-3 आणि मेट्रो-4 चे एकत्रित कारशेड येथे उभारले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे याला एमएमआरडीएने इंटिग्रेटेड मेट्रो कार डेपो, कांजूरमार्ग असे नाव दिले आहे. त्यामुळे आता येथे मेट्रो हब तयार होणार यात शंकाच नाही.