मुंबई - मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सी लिंकवर अधिक भर दिला जात आहे. त्यानुसार आता मुंबईत लवकरच आणखी एका सी लिंकची भर पडणार आहे, ती म्हणजे नरिमन पॉईंट ते कफ परेड सी लिंकची. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी हाती घेतला होता. मात्र, काही कारणाने हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. आता मात्र हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेत याचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएने नुकतीच एक निविदा मागवली आहे.
2008पासून रखडलेला प्रकल्प -
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उत्तर म्हणून अनेक पर्याय एमएमआरडीएकडून पुढे आणण्यात आले. मेट्रो, मोनो, उन्नत मार्ग याबरोबरच सी लिंकचा ही यात समावेश होता. त्यानुसार नरिमन पॉईंट ते कफ परेड हे अंतर काही मिनिटात सुपरफास्ट पार करता यावे, यासाठी नरिमन पॉईंट ते कफ परेड सी लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार 2008 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी ही मिळाली. पण प्रत्यक्षात मात्र अजूनही हा प्रकल्प काही मार्गी लागलेला नाही.
यामुळे प्रकल्प बासनात -
2008 मध्ये एमएमआरडीएच्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. पण त्यानंतर यावर काहीही काम झाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे एकीकडे या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तर दुसरीकडे नरिमन पॉईंट पुनर्विकासाच्या हालचाली सुरू झाल्या. परिणामी हा प्रकल्प एमएमआरडीएने गुंडाळला. दरम्यान 2019 मध्ये पुन्हा या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेने हा प्रकल्प हाती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. याचेही पुढे काही झाले नाही. आता मात्र, हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
1.6 किमीचा सी लिंक -
नरिमन पॉईंट ते कफ परेड सी लिंक हा 1.6 किमीचा असणार आहे. या सी लिंकमुळे तासांचा प्रवास मिनिटांमध्ये होणार आहे. आता या प्रकल्पासाठी 11 जानेवारीला निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे. जूनपर्यंत याचा अहवाल सादर झाल्यानंतर मग पुढे प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येईल.
आदित्य ठाकरेंनी घेतला प्रकल्पाचा आढावा -
या प्रकल्पाचा काल(बुधवार) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी हा प्रकल्प राबवतना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि मच्छिमार व्यवसायाला फटका बसणार नाही, याची काळजी घेत प्रकल्प राबवण्याची सूचना एमएमआरडीएला केली.