मुंबई - कोरोना महामारीत कोरोनाबाबत अशास्त्रीय-अवैज्ञानिक दावा करणे अखेर जळगावच्या एका डॉक्टरला महाग पडले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे (एमएमसी)ने त्या डॉक्टरला नोटीस बजावली आहे. सात दिवसांत या नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश एमएमसीने दिले आहेत.
जळगावमधील भाडगाव येथील सरकारी कोविड सेंटरमध्ये डॉ. निलेश पाटील (ऑर्थोपेडिक सर्जन) आणि त्यांची पत्नी डॉ. पल्लवी पाटील यांना कोविड रुग्णांवर योग पद्धतीने उपचार करण्यास परवानगी देण्यात आली होती. यादरम्यान या डॉक्टर दाम्पत्याने कोरोना रुग्णांवर उपचार करताना पीपीई किट वापरण्याची गरज नाही. आम्ही पीपीई किट न वापरता त्यांच्यावर उपचार करत आहोत, असा दावा केला. तसेच योगा, मेडिटेशन आणि फ्रूट ज्यूस अशा उपायांनी आम्ही अनेक रुग्णांना बरे केल्याचा दावा केला. तशा मुलाखती त्यांनी प्रसार माध्यमातून दिल्या. कोरोनाच्या काळात असे अशास्त्रीय-अवैज्ञानिक दावा करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे म्हणत अखेर एमएमसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे.
याविषयी डॉ. पाटील यांच्याशी 'ईटीव्ही भारत' ने संपर्क साधला असता अशी नोटीस मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. याला आपण लवकरच उत्तर देऊ असेही ते म्हणाले. त्याचवेळी कोरोना रुग्णाशी 5 फुटांवरून बोलताना पीपीई किटची गरज नसून रुग्णांवर उपचार करताना आपण पीपीइ किट वापरत नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याआधीच या प्रकरणाची दखल घेत 4 जुलैपासून सरकारी कोविड सेंटरमधील काम बंद केले आहे. राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आता डॉक्टर या नोटिशीला नेमकं काय उत्तर देतात आणि एमएमसी पुढे काय कारवाई करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.