मुंबई : महाविकास आघाडीत शिंदे गटाच्या आमदारांनी अजित पवार यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती. शिंदे गटाने त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. वर्षभरातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा देत, मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या शिंदे गटाच्या इच्छुकांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे. मंत्रिमंडळ लवकरच विस्तार होईल, असे सांगण्यात येते. त्यापूर्वीच पालकमंत्री पदावरून शिंदे-पवार गटात जुंपली आहे. शिंदे गटाकडून अनेक भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना विरोध होतो आहे. बुलडाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उघडपणे यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. बुलढाण्यात शिंदे गट-भाजपचे पाच आमदार आहेत. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री असायला हवा, असे गायकवाड म्हणाले आहेत.
समान निधी वाटप होईल : अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री होते. राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना भरीव निधी दिला. तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांचा त्यांच्यावर वचक नव्हता. अजित पवारांचे त्यावेळी फावले होते. सत्ता पवारांच्या हातात होती. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. 24 तास काम करणारे नेतृत्व आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष असते. निधी वाटपात दुजाभाव होणार नाही. समान निधी वाटप होईल. महाविकास आघाडीच्या काळातील इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.
गटाला फोडण्याची गरज का वाटली : राज्यातील सरकारकडे बहुमताचे संख्याबळ आहे. तरीही अजित पवार गटाला फोडण्याची गरज का वाटली, असा प्रश्न विचारला. आमदार गायकवाड त्यावर म्हणाले की, कोणीही कोणाला फोडलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मागील अडीच वर्षाच्या सत्ताकाळात लोकोपयोगी कामे होत नव्हती. सध्या विकासाचे गतीमान सरकार राज्यात आहे. अजित पवार हे त्यामुळे सत्तेत सामील झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
शंभरच्यावर जागा लढवू : भाजपने 80 टक्के म्हणजेच 152 जागा निवडून आणू, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. विरोधी पक्षाने त्यानंतर शिंदे गट, अजित पवार गटाला डिवचले. शिंदे गटात देखील नाराजीचे सूर आहेत. भाजप दीडशे जागा निवडून आणणार असेल तर आम्हीसुध्दा शंभरच्यावर जागा लढवू, असे गायकवाड म्हणाले आहेत. तसेच निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे निर्णय घेतील. निवडणुका होईपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -