मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरशी केली. तसेच मुंबई पोलिसांवर माझा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मुंबईत राहणे धोक्याचे आहे, अशा पद्धतीची ट्विट करून तिने महाराष्ट्राची व प्रामुख्याने मुंबईची बदनामी केली आहे. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी विधानसभेने एकमुखाने ठराव संमत करावा, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला 60 वर्षे पूर्ण झाली असून अखंड महाराष्ट्र व प्रामुख्याने मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेक आंदोलने झाले आणि त्यानंतर अखंड महाराष्ट्र झाला. अशा महाराष्ट्राची राजधानी मुंबईत परराज्यातून एक मुलगी येते, ती अभिनेत्री होऊन नाव कमावते, पैसा कमावते आणि त्याच मुंबईला बदनाम करते. त्यामुळे तिच्यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक होते. मात्र, आतापर्यंत कारवाई न झाल्याने आपल्याला दुःख वाटत असल्याचे आमदार सरनाईक यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राची आणि मुंबईची वारंवार बदनामी केली आहे. त्यामुळे सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ट्विट करून अनेक कलाकारांवर अमलीपदार्थाच्या सेवनप्रकरणी आरोप केले आहेत. सभागृहात सर्व सदस्यांनी या घटनेचा निषेध करून सर्वानुमते कंगनावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करावा, अशी विनंतीही आपण केली असल्याची माहिती सरनाईक यांनी सांगितले.