मुंबई - बेलापूर मतदारसंघातील भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे या विधानसभेच्या पायऱ्यांजवळ आल्या. दरम्यान, तेथे उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना पाहिलं आणि धावत येऊन त्यांनी मंदा म्हात्रे यांची गळाभेट घेतली. काही क्षणाच्या या गळाभेटीनंतर मंदा मात्रे या भावूक झाल्या. पक्ष आणि सर्व प्रकारचे मतभेद विसरून सुप्रिया सुळे या आपले स्वागत करून आपली गळाभेट घेतात हे पाहून मंदा म्हात्रे यांना गहिवरून आले होते. त्यानंतर या दोघी हातात हात घालून विधानभवनाच्या पायऱ्या चढत वर गेल्या.
मंदा म्हात्रे या भाजपच्या आमदार असल्या तरी यापूर्वी त्या मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या होत्या. नवी मुंबईतील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील २ टर्म पासून त्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार झाल्या आहेत. मागील निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे नेते व आता भाजपवासी झालेले गणेश नाईक यांचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर त्यांचे भाजपमध्ये एक चांगले वजन निर्माण झालेले आहे.
हेही वाचा - मी राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार - अजित पवार
आज मंदा म्हात्रे विधानसभेच्या आमदार म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी विधानभवन परिसरात पोहोचल्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गळाभेट करून त्यांचे स्वागत केले. या गळाभेटीनंतर नेमके काय बोलावं हे मंदा म्हात्रेंना सुचत नव्हतं. त्यातच दोघी एकमेकांच्या हातात हात घालून विधानसभेच्या पायऱ्या चढत वर गेल्याचे चित्र आज विधानभवन परिसरात दिसून आले.
हेही वाचा - आगे आगे देखो होता है क्या - सुप्रिया सुळे