मुंबई - विचारवंतांच्या हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा हात असल्याचे मी सांगितले होते. त्यामुळे मलाही मारण्याचा कट रचला होता. सुदैवाने मी बचावलो असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच कळसकर आणि अंदुरे प्यादे असून सनातन्यांचे खरे मारेकरी बाप शोधा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली. यात त्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. तसेच त्यामध्ये सचिन अंदुरेचाही हात असल्याची कबुली कळसरने दिली असल्याचे आव्हाड म्हणाले.
गेल्या वर्षी जून महिन्यात पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, अशीदेखील कबुली कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिली आहे. त्यानुसार सीबीआयने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना दाभोलकर हत्याप्रकरणात अटक केली. तसेच रविवारी पुणे न्यायालयाने पुनाळेकरला ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.