मुंबई MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढं सुरू झाली . मागील दोन दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी सुरू आहे. त्यामुळे आजची सुनावणी सुरू होण्यापूर्वी सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांवर सुनावणीत शिंदे गटाला झुकतं माप देण्याचा आरोप करत, तसं पत्र विधी मंडळाला लिहिलं आहे.
नार्वेकरांचा वेळकाढूपणा, सुनिल प्रभूंचा आरोप : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मागील दोन दिवसात केवळ शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून उलट तपासणी सुरू आहे. ही तपासणी म्हणजे केवळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप सुनावणीच्या पहिल्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांनी केला होता. परंतु दुसऱ्या दिवशी सुद्धा सुनील प्रभू यांची उलटतपासणी केली गेली. या तपासणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिंदे गटाला झुकते माप देत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. म्हणून पुरावे आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी तसेच साक्ष नोंदवण्यासाठी काही ठराविक वेळ दिली आहे. तरीसुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिंदे गटाला वाढीव वेळ देऊन कारवाई लांबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असा आरोप सुनील प्रभू यांनी केला आहे.
सुनील प्रभू निशाण्यावर : आज सलग तिसऱ्या दिवशी आमदार अपात्रतेच्या प्रकरणी विधानभवनात सुनावणीला सुरुवात झाल्यावर सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. मागील दोन दिवस शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे सुनील प्रभू यांनी प्रतोद म्हणून 21 जून 2022 रोजी बैठकीसाठी व्हीप बजावला होता, त्यावरूनच महेश जेठमलानी हे सुनील प्रभू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
दोन्ही गटात जोरदार युक्तिवाद : शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि अनिल साखरे तसेच ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात आजही जोरदार युक्तिवाद सुरू आहे. सुनील प्रभू यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिंदे गटाला झुकतं माप देत असल्याचा आरोप करत आहेत. मात्र तरीही राहुल नार्वेकर यांनी उलट तपासणीस वेळ लागत असल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सलग सुनील प्रभू यांची उलट तपासणी सुरू असून आज ही उलट तपासणी संपते का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :