मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. भाजपसोबत करण्यात आलेल्या 50-50 फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाली असून जागा वाटपात शिवसेनेला समसमान जागा देण्यात आल्या नाही, अशी नाराजी निवनिर्वाचित आमदारांनी व्यक्त केली. तसेच सत्ता स्थापन करताना शिवसेनेला समान वाटा देण्याची मागणी आमदारांकडून करण्यात आली. शिवसेना आणि भाजपला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून द्यावे आणि हे सर्व उद्धव ठाकरे यांनी लेखी स्वरुपात भाजपकडून लिहून घ्यावे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी ५०-५० चा फार्म्युला आधीच ठरला असून त्यानुसारच सत्तेची विभागणी होईल, असा इशारा दिला होता. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. यावेळी निवडणुकीच्या आधीपासूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची मागणी सर्वजण करीत आहे. मात्र, याबाबत निर्णय उद्धव ठाकरेच करतील, असे आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले. तसेच त्यांनी सर्व जनतेचे आभार देखील मानले.
आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ देखील सोडायला तयार होतो. त्यामुळे आदित्य मुख्यमंत्री होण्याचे गरजेचे असल्याचे आमादर रमेश कोरगावकर म्हणाले.
एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे. ही इच्छा उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितली आहे. शिवसैनिक मुख्यमंत्री होण्यात गैर काय आहे? आमची सर्वांची इच्छा आहे की, एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेला कोकणात चांगले यश मिळाले आहे. यंदा रायगडमध्ये देखील चांगलं निकाल आले असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.