मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, आमचा पक्ष लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. पक्षात संघटनात्मक काम करावे, असे अजित पवार यांना वाटले असावे. कालच्या भाषणात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ कोण? किती वेळा होते हे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद ओबीसी समाजाला द्यायला हवे. फक्त ओबीसी विषयी बोलून चालणार नाही तर, पदे दिली पाहिजेत अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.
इतर पक्षानी दिला ओबीसी चेहरा : महाराष्ट्रातील इतर पक्षांचा विचार केला तर, प्रदेशाध्यक्षपदावर ओबीसी चेहरा दिला आहे. ओबीसी चेहरा म्हणून भारतीय जनता पार्टीने चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसने नाना पटोले यांना पद दिले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्र्वादी काँग्रेसनेही ओबीसी समाजातील व्यक्तीला संधी द्यावी असे भुजबळ म्हणाले.
मला संधी द्या, काम करेल : आमच्या पक्षातही ओबीसी नेते आहे. सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे ओबीसी चेहरे आहे. यांना संधी दिली जावी. मला संधी दिली तर, मी आनंदाने काम करेल असे भुजबळ म्हणाले आहेत.
चर्चा सुरु : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलावे अशी, इच्छा राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांची आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडले तर, त्यापदावर मुख्य दावा जयंत पाटील यांचा होण्याची शक्यता असल्याचे समजते. तर, दुसरकीडे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ऐवजी अजित पवार, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. प्रदेश अध्यक्ष पद तसेच विरोधी पक्ष नेते पद दोन्हीपैकी एक मराठा, दुसरे ओबीसीला करावे याबाबत पक्षात चर्चा सुरू झाल्याचे समजत आहे.
शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा नाही : विरोधी पक्ष नेता मराठा असेल तर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ओबीसी असावे असे, माझे मत आहे. याबाबत शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते पदावर कोणाची वर्णी लागते हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा - Opposition Parties Meeting Patna : पाटणात विरोधी पक्षांची बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार