ठाणे - राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तापेचावरून बच्चू कडूंनी नेत्यांना खडे बोल सुनावले आहे. राज्यात सध्या सुरू असलेला प्रकार हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला काळिमा लागत असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. ही नेत्यांची पळवपळवी महाराष्ट्राला न शोभण्यासारखी आहे आणि नेत्यांनी ती थांबवावी, असेही ते म्हणाले.
आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद महत्वाचे नाही. या राज्यात मुख्यमंत्री नाही झाला, तरी काही फरक पडणार नाही. मात्र, शेतकरी, शेतमजूर यांचा विचार करणारे सरकार पाहिजे, असे मत बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपूंजी असून तीही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभिर्याने पाहावे, अशी विनंती आमदार बच्चू कडू यांनी केले. नेत्यांनी खूर्चीसाठी मरण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी लढावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.