मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने दिला गेलेला पहिला पुरस्कार देण्यात आला. म्हणून तत्कालीन आघाडी सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने सुरू होणाऱ्या संगीत विद्यालयाची परवानगी नाकारली, असा खळबळ जनक आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केला.
मविआने परवानगी नाकारली: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू करण्यात आली. पुरवणी मागण्यांवर बोलताना भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर तत्कालीन आघाडी सरकारने लता मंगेशकर संगीत विद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. या विद्यालयाला परवानगी देण्यासंदर्भातील फाईल ही तयार झाली होती. ही फाईल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात येणारा स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने पहिला पुरस्कार देण्यासाठी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली.
परवानगी रद्द करण्याचे कारण: लता मंगेशकर यांच्या नावाने दिला गेलेला पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. तसेच या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले नाही, म्हणून कद्रू मनोवृत्तीच्या मुख्यमंत्र्यांनी संगीत विद्यालयाची परवानगीच रद्द केली, असा आरोप आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केला. मात्र त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विद्यालयाला तातडीने परवानगी दिली.
विद्यालयाला विद्यापीठाची मान्यता मिळावी: लता मंगेशकर संगीत विद्यालय सुरू झाल्याबद्दल आशीष शेलार यांनी सरकारचे अभिनंदन केले. तसेच या विद्यालयाला आता विद्यापीठाची मान्यता देण्यात यावी, अशी मागणी ही त्यांनी सभागृहात केली. या संगीत विद्यालयात संगीत लायब्ररी सुरू करण्यात यावी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची वाद्य या विद्यालयात उपलब्ध करून देण्यात यावीत, असेही आशिष शेलार यावेळी म्हणाले.
राऊतांवर टीकास्त्र: राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर अपशब्द वापरत टीका केली आहे. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडे काही लॉजिक नाही. राऊत नैराशात आहेत. त्यांच्याकडे शब्द नाहीत, कोणते लॉजिक नसते तेव्हा माणूस शिव्या देतो म्हणून ते शिव्या देत आहेत. याबाबत सभागृहात मी मागणी मांडली त्यांच्यावर कारवाई करावी. सामान्य जनतेला उगसवले जात आहे, हे योग्य नाही, याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आमदार शेलार यांनी केली आहे.
हेही वाचा: CM Eknath Shinde : तब्बल 2 कोटी चहावर खर्च; मुख्यमंत्री म्हणाले, माझ्याकडे येणारे लोक सोन्यासारखे