मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुंबईत पार पडली. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आदी नेते उपस्थित होते. सध्याचे राज्यातील राजकारण हे स्वार्थी विरुद्ध निस्वार्थी सुरु असून घटनाबाह्य मुख्यमंत्री खुर्चीसाठी काम करत असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.
स्वार्थी विरुद्ध निस्वार्थी : राज्यातील सगळे राजकारण स्वार्थी विरुद्ध निस्वार्थी सुरु आहे. राज्यात राजकारण गलीच्छ पातळीवर गेले आहे. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरवल्यानुसार आम्ही जनतेच्या प्रश्नांवर लढत राहणार आहोत. घटनाबाह्य मुख्यमंत्री खुर्चीसाठी काम करत आहेत. मुंबईची हालत बघा, प्रत्येक शहराची हालत बघा. ह्या घटनाबाह्य सरकारला आम्ही लढा देत आहोत. तसेच ज्या आशेने आमदार जात आहे, त्यांना अजून मंत्रीपद दिले गेले नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपवर केली आहे. ज्यांनी त्यांना फोडले त्यांनाच मंत्रीपद दिले नाही. माझ्याकडे मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी माहिती आली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही माहीत नाही. नीलम गोऱ्हे यांच्या प्रश्नावर विचारले असता ह्यावर मी काही बोलणार नाही. जेव्हा जे होईल तेव्हा होईल, सगळ्याच गोष्टी उघड केल्या जात नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
अधिवेशन तीन आठवडे करा : पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यामुळे तीन आठवडे पावसाळी अधिवेशन करावे अशी आमची मागणी आहे. यामुळे काही आमदारांना कामकाजात भाग घेता येणार आहे. कामकाज सल्लागार समिती बैठकीपूर्वी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यात आम्ही एकत्रित पणे चर्चा केली. अधिवेशनात कशा पद्धतीने काम करता येईल. जनतेचे प्रश्न कसे मांडता येतील यावर चर्चा केली. विरोधी पक्ष नेते पदाबाबतचा निर्णय महाविकास आघाडीचे सर्वजण एकत्र बसून घेणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
पक्षासोबत गद्दारी : संधीसाधू लोक पक्षाला सोडून जात असतील तर जागा भरून काढू अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले की, ज्यांना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी भरभरून दिले तेच लोक पक्षासोबत गद्दारी करीत आहे. नीलम गोऱ्हे यांना 4 वेळा विधानपरिषद आमदार केले. उपसभापती केले. कुठलाही प्रचार न करता, शिवसैनिकांच्या मेहनतीवर त्या चारवेळा आमदार होत्या. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज शिवसैनिकांना किती दुःख होत असेल. काही मिळत नाही म्हणून जात आहेत. पण लाखो लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. आम्ही जे गेले त्यांचा विचार करीत नाही. आता त्यांना जी आश्वासने दिली ती मिळायला हवी. तसेच विरोधी पक्षनेते पदाबाबत लवकरच वरिष्ठ निर्णय घेतील असे देखील परब म्हणाले.