मुंबई - 'पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलैला होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती, त्यापेक्षा जास्त मताने जिंकू', असा विश्वास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी याआधीच काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने आपल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे.
आघाडी सरकार भाजपा आमदार फोडणार?
तर, 'व्हीप जारी केल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आघाडी सरकार घाबरत आहे', असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तसेच, भाजपा आमदारांना व्हीप जारी करण्याची गरज नाही, असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र, नवाब मलिक यांनी 'आघाडी सरकारच्या आमदारांच्या आकड्यापेक्षा अधिक मोठ्या आकड्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकू', असा विश्वास बोलून दाखवल्याने आघाडी सरकार भाजपाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उपाध्यक्षांना पत्र -
'विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सुचवले होते. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसांचे अधिवेशन असले तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल', असे नवाब मलिक यांनी सांगितले.
'12 नामनिर्देश आमदारांच्या पत्राचे काय झाले?'
'राज्यपाल विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा, असे सूचित करत आहेत. मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत. त्या प्रलंबित विषयाबद्दल राज्यपाल काहीही बोलत नाहीत. त्या १२ आमदारांची निवड झाल्यास महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील', अशी आठवण नवाब मलिक यांनी राज्यपालांना करून दिली.
हेही वाचा - बारा आमदारांच्या पत्रांचा राज्यपालांना विसर - नाना पटोले