मुंबई - कोरोनाची दुसरी लाट दिल्लीपासून गुजरात आदी राज्यांमध्ये येऊन ठेपली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. आपल्याकडेही मागील काही दिवसांत संख्या वाढत असल्याचे लक्षात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात सुद्धा सर्व परिस्थिती पाहून कर्फ्यू अथवा इतर महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत दिली. तसेच तूर्तास तरी राज्यात दुसरा लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली, गुजरातमधील रुग्णसंख्या वाढत आहे. अहमदाबादमध्ये नाइट कर्फ्यू सुरू केला असून सुरतमध्ये सुरू करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या सगळ्यांचा विचार आम्ही करत आहोत. पुढील आठ दिवसांत महाराष्ट्रात रुग्णसंख्या किती पटीने वाढते त्याचा आढावा आम्ही घेणार असून त्यानंतर आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, असेही वडेट्टीवार म्हणाले.
गरज पडल्यास विमानसेवा बंद करू -
राज्यातील संख्या वाढली तर, दिल्ली-गुजरातवरून येणारी रेल्वेसेवा, बससेवा, विमानसेवा बंद करण्याबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. इतकेच नाही तर, ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला आवश्यकता पडल्यास आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद करण्याबाबत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
तूर्तास दुसरा लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही -
पुणे, औरंगाबाद, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा आढावा घेऊन एकूण संख्या किती वाढते ते बघून आम्ही पुढच्या आठ दिवसांत निर्णय घेऊ. आवश्यकता पडली तर, सगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावेच लागतील. मात्र, तूर्तास दुसरा लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.