मुंबई - कर्नाटकात स्थिर सरकार हवे आहे, असा दावा करत मागील काही दिवसांपासून आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत. या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या त्या आमदारांची भेट घेण्यासाठी कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री डी.के. शिवकुमार उद्या (बुधवारी) मुंबईत येणार आहेत. शिवकुमार यांच्या भेटीमुळे आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षातील दोन्ही आमदारांच्या झालेला गैरसमज दूर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील काही दिवसांपासून कर्नाटक मधील १० काँग्रेस आमदार हे मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या सोफिटेल हॉटेलात तळ ठोकून आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच मुंबईत आलेल्या या आमदारांना प्रदेश काँग्रेसच्या एकाही नेत्यांना भेटू दिले जात नाही. तर दुसरीकडे भाजपचे आमदार, पदाधिकारी हे त्यांना भेटत असल्याने याविषयी अनेक उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे हे आमदार काल गोव्याला गेल्याची खोटी माहिती माध्यमात पेरण्यात आली होती. परंतु, त्यांचा मुक्काम हा सोफिटल हॉटेल येथून हालवून तो पवई येथील रेनेसोंस या हॉटेलमध्ये आज करण्यात आला आहे. तेथेही भाजपचे आमदार आणि पदाधिकारी यांच्या व्यतिरिक्त या आमदारांना कोणाला भेटू दिले जात नाही. कर्नाटकचे सांस्कृतिक व पाणी पुरवठा मंत्री डी.के. शिवकुमार हे या आमदारांची भेट घेण्यासाठी मुंबईत पोहचत आहेत.