मुंबई - 'देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही लपवण्यासारखं नसेल तर नवाब मलिक यांनी केलेल्या पत्रकार परिषदेत याची चिंता त्यांना वाटायला नको. सत्य आपल्या बाजूने असल्यास भीती वाटत नाही. मात्र, तुमचे काही वाईट हेतू असल्यास ते उघडे पडतील, असा इशारा मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना दिला.
![minister nawab malik daughter nilofar khan tweet](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-malik-7209727_10112021164954_1011f_1636543194_781.jpg)
अमृता फडणवीस म्हणाल्या बिगडे नवाब...
कार्डिलिया कृज प्रकरणावरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलेले पाहायला मिळत आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप होत असताना अमृता फडणवीस यांनीही ट्विटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांना टोला लगावला. बिगडे नवाब असा उल्लेख आपल्या ट्विटमधून त्यांनी केला होता. मात्र, अमृता फडणवीस यांच्या ट्विटला नवाब मलिक यांची मुलगी नीलोफर खान यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही लपवण्यासारखं नसेल तर नवाब मलिक यांनी केलेल्या पत्रकार परिषदेत याची चिंता त्यांना वाटायला नको. सत्य आपल्या बाजूने असल्यास भीती वाटत नाही. मात्र, तुमचे काही वाईट हेतू असल्यास ते उघडे पडतील, असा इशारा निलोफर खान यांनी अमृता फडणवीस यांना दिला.
हेही वाचा - सहकार्य करा, राजकीय पोळ्या भाजू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
निलोफर खान यांचे मुक्त पत्र -
या आधीही निलोफर खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मुक्त पत्र लिहिलं होतं. या मुक्त पत्रातून आपल्या पतीला कशाप्रकारे खोट्या आरोपाखाली एनसीबीने पकडले. तसेच एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर लोकं आपल्याला ड्रग्स पेडलरची पत्नी म्हणून हिणवू लागले होते. लोकांनी आमच्या सर्व कुटुंबावर आरोप लावले असल्याचेही पत्रात म्हटले आहे.