मुंबई - महाराष्ट्रात जे काही घडत आहे ते सर्व राजकीय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे त्यावर नवाब मलिक यांनी भाजपवर निशाला साधला.
ईडीच्या कारवाईचा अर्थ राजकीय कारवाई
ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होते. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी. पण, ज्या पद्धतीने भाजपचे नेते मागणी करत आहेत व कारवाई होते याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत किती खटले दाखल आहेत व किती खटले प्रलंबित आहेत, याबाबत ईडीला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते, असेही नवाब मलिक म्हणाले.
आघाडी सरकारच्या अकरा नेत्यांवर होईल अटकेची कारवाई, किरीट सोमैया यांचे भाकीत
दापोली येथील अनधिकृत बंगला, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. यासंबंधीच्या तक्रार आपण केली असून त्यानंतर ही कारवाई सुरू झाली असल्याचे किरीट सोमैया यांनी सांगितले. तसेच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. सोमवारी (दि. 30 ऑगस्ट) वाशिममध्ये ईडीडून भावना गवळी यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. आघाडी सरकारच्या एकूण अकरा नेत्यांवर अटकेची कारवाई होईल, असे भाकीत किरीट सोमैया यांनी केले आहे.
हेही वाचा - Corona update : मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट तर ११ दिवसात रुग्ण दुपटीचा कालावधी ४४६ दिवसांनी घसरला