मुंबई - ठाण्यातील वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत होते. पण आजअखेर हा प्रश्न राज्य सरकारकडून मार्गी लावण्यात आला आहे. या पोलीस वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण अजूनही हा प्रकल्प सुरू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता म्हाडाने त्वरित हा पुनर्विकास मार्गी लावावा, असे आदेश आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत.
आता ठाण्यातील वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या पुनर्विकासाअंतर्गत 567 घरे पोलिसांसाठी निवासस्थान म्हणून असणार आहेत. तर उर्वरित घरे सर्वसामान्यांसाठी लॉटरीद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 1973 मध्ये पोलीस आयुक्तालयाला 856 घरे पोलिसांच्या निवासस्थानासाठी दिले होते. पण आता ही घरे जुनी झाली असून इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. तर, म्हाडाने हा पुनर्विकास करावा अशी ही मागणी केली जात आहे. त्यानुसार म्हाडाने या वसाहतीच्या पुनर्विकासासंबंधी अनेकदा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. पण प्रत्यक्षात मात्र अजूनही हा पुनर्विकास काही मार्गी लागलेला नाही. हा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी आज आव्हाड यांनी एक बैठक बोलवली होती. या बैठकीत म्हाडाकडून पुनर्विकास मार्गी लावण्याचा अंतिम निर्णय घेत यादृष्टीने त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
म्हाडाने त्वरित हा पुनर्विकास मार्गी लावावा, असे आदेश या बैठकीत देण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितले आहे. दरम्यान मागील दोन वर्षांपासून म्हाडा हा पुनर्विकास मार्गी लावेल असे सांगत आहे. तेव्हा आता आज झालेल्या निर्णयानुसार, तरी म्हाडा आता तरी प्रत्यक्षात हा पुनर्विकास मार्गी लावते का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.