मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'निवडणुका झाल्या की दरवाढ ही ठरलेलीच असते. हे काय वित्त नियोजन आहे?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'केंद्रीय अर्थ मंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच! हे काय नियोजन आहे, यावर निर्मला सितारामण यांनी प्रकाश टाकायला हवा' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये प्रति लिटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचं पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे लिटर तर, डिझेलही 90 रुपये 68 पैसे लिटर दराने विक्री केले जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 98.36 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
हेही वाचा - पाच राज्यांच्या विधानसभेतील पराभवाच्या विश्लेषणासाठी अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात काँग्रेसची समिती
हेही वाचा - पोलीस निरिक्षक पतीचा कोरोनाने मृत्यू, तिसऱ्याच दिवशी डॉक्टर पत्नी कामावर झाली रुजू