मुंबई - राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये ७ ते ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. तसेच राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद, तर काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी सांगितले.
शिवसेनेचे १५ मंत्री, राष्ट्रवादीचे १३ मंत्री आणि १ उपमुख्यमंत्री, तर काँग्रेसचे १३ मंत्री आणि १ विधानसभा अध्यक्षपद, असे मंत्रिमंडळ असल्याचे बोलले जात आहे. तसेच ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे सांगितले जात आहे.
हे वाचलं का? - उद्धव ठाकरे आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिवाजी पार्कवर सोहळ्याची जय्यत तयारी
महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाबाबत, विविध आयोगांबाबत, महामंडळांबाबत अंतिम चर्चा पूर्ण झाली. ठरल्याप्रमाणे आज सायंकाळी शपथविधी होणार आहे. सर्व पक्षांची सहमती झाली आहे. त्यानंतर अधिवेशन बोलवले जाईल आणि विश्वासदर्शक ठराव आणला जाईल. ३ डिसेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठराव आणण्याची मुदत आहे. तेव्हापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. अध्यक्ष काँग्रेसचा असेल, तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल. या सरकारमध्ये १ उपमुख्यमंत्री असेल आणि ते राष्ट्रवादीचा असेल. मात्र, यामध्ये कोणते मंत्री शपथ घेणार आहेत? याबाबत अद्यापही माहिती मिळाली नाही.