मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पुरवणी मागण्यांच्या सत्रामध्ये राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली.
राम मंदिर देणगी मुद्द्यावरून सुरू झाला वाद-विवाद
काही दिवसांपूर्वी मालवणीमध्ये राम मंदीर बांधणीसाठी देणगी देण्याचे आवाहन करणारे बॅनर्स पोलिसांनी फाडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदवल्याचा आरोप मंगलप्रभात लोढा यांनी केला. ज्या मुंबई पोलिसांची तुलना लंडनच्या 'स्काॅटलंड यार्ड'शी केली जाते, त्यांच्यावर केवळ स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करणे योग्य नाही, असे प्रत्युत्तर अस्लम शेख यांनी दिले.
...तर राजीनामा द्यावा -
शेख यांनी लोढांच्या मालवणीमधील हिंदू पलायणाच्या मुद्द्याचा खरपूस समाचार घेतला. ज्या मतदारसंघामध्ये तीन लाख मतदारांपैकी २ लाख ३० हजार पेक्षा जास्त मतदार हिंदू आहेत. तिथे हिंदू अल्पसंख्यक कसे काय असू शकतात? असा प्रश्नही शेख यांनी विचारला. लोढा यांनी बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा काढताच अस्लम शेख यांनी भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष हा बांग्लादेशी घुसखोर असल्याचा आरोप केला. यावर हे सत्य असेल तर मी राजीनामा देईल आणि खोटे असेल तर अस्लम शेख यांनी राजिनामा द्यावा, असे आव्हान लोढांनी दिले आहे.
काही दिवसांपूर्वी रुबेल शेख नावाच्या बांग्लादेशी घुसखोराला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी अटक केली होती. चौकशीअंती हा युवक भाजप उत्तर मुंबई अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष असल्याचे स्पष्ट झाले होते. शेख यांना विधानसभेत आव्हान देणारे लोढा आता आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.