मुंबई : उत्तराखंडची चार धाम यात्रा दरवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत होते, दरवर्षी लाखो यात्रेकरू तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी येतात. चार धाम यात्रा यमुनोत्री, गंगोत्री येथून सुरू होते आणि केदारनाथ मार्गे बद्रीनाथच्या दर्शनाने समाप्त होते. ही चार मंदिरे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग, उत्तरकाशी आणि चमोली जिल्ह्यांतर्गत येतात. उत्तराखंड बाहेरून येणारे प्रवासी सहसा हरिद्वार किंवा ऋषिकेश येथून चार धामचा प्रवास सुरू करतात, जरी चार धामला भेट देण्यासाठी अनेक मार्ग आहेत, परंतु जे प्रवासी भारतातील विविध ठिकाणाहून येतात त्यांचा प्रवास हरिद्वारपासूनच सुरू होतो. येथून चार धाम यात्रा मार्ग हरिद्वारपासून सुरू होतो आणि ऋषिकेश, देवप्रयाग, टिहरी धारासू, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, त्रियुगीनारायण, गौरीकुंड, केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे संपतो.
चारधाम मध्ये काय पाहायला मिळते : ऋषिकेश हे हरिद्वारपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे आणि डेहराडून जिल्ह्यांतर्गत येते. पण ते हरिद्वारपासून जवळ आहे आणि चारधाम यात्रेदरम्यान हरिद्वारपासून वापरल्या जाणाऱ्या मार्गात ऋषिकेश देखील येतो. ऋषिकेशला गढवालचे प्रवेशद्वार देखील म्हटले जाते, ते पूर्णपणे धार्मिक शहर आहे. धरसू हे उत्तरकाशी जिल्ह्यांतर्गत वसलेले एक शहर आहे.हे भागीरथी नदीच्या काठी वसलेले आहे.धारसू ते यमुनोत्रीपर्यंत बरकोट ते जानकीछट्टी असा बसचा प्रवास आहे.या मंदिरापर्यंत जाण्यासाठी जानकीछत्तीपासून कित्येक किलोमीटर चालत जावे लागते. यमुनोत्री येथील मंदिराव्यतिरिक्त सप्त ऋषी कुंड, सूर्य कुंड आणि दिव्या शिला ही पाहण्यासारखी आहेत. धरसू ते गंगोत्री असाही रस्ता आहे, इथून गंगोत्री १३७ किमी आहे, हा प्रवास बसने केला जातो. त्रियुगीनारायण हे मंदिर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथच्या वाटेवर येते.हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, असे मानले जाते. मंदिराजवळून सरस्वती गंगा नावाचा प्रवाह निघतो. कालीमठ या मंदिराला केदारनाथ यात्रेदरम्यान देखील भेट दिली जाते, हे माँ कालीचे मंदिर आहे आणि ते शक्तीपीठ मानले जाते. स्कंद पुराणात या मंदिराची चर्चा आहे, असे मानले जाते की या मंदिराजवळ माँ कालीने रक्त बीजाचा वध केला होता.
बोधगया सर्वात मोठे धार्मिक स्थळ : नेपाळमधील लुम्बिनी येथे भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. भारतात भगवान गौतम बुद्ध यांना बुद्धगया येथे एका पिपळाच्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली. या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात होते. बोधगया हे बौद्धधर्मातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ मानले जाते. सारनाथ या ठिकाणी धर्मशाळा असून बौद्ध तीर्थस्थळ आहे. भगवान बुद्धांनी आपला पहिला उपदेश येथूनच दिला होता. यामुळे दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी येत असतात. भगवान बुद्धांचे कुशीनगर मध्ये महापरिनिर्वाण झाले होते. कुशीनगर जवळ हिरण्यवती नदीजवळ बुद्धांनी अखेरचा श्वास घेतला. रामभर स्तूपाजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी तसेच इतर बौद्ध धर्मीय पर्यटन स्थळाचा यात समावेश आहे.
दक्षिण भारतातील पर्यटन स्थळे : दक्षिण भारतात विशेष करून समुद्र किनारी अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. ज्या स्थळांना वर्षाला लाखो पर्यटक भेट देतात. दक्षिण भारतात एकूण १२ पर्यटन स्थळे आहेत. कर्नाटकमध्ये म्हैसूर, हम्पी, बदामी, आय होले आणि पट्टाक्याकल, कूर्ग, केरळ येथील बॅकवॉटर, वर्कला, फोर्ट कोची. तामिळनाडू येथील मदुराई, महाबलीपुरम, रामेश्वरम आणि धनुशकोदी, निलगिरी माउंटन रेल्वे तसेच पांडिचेरी या ठिकाणी धार्मिक तसेच पर्यटन स्थळे आहेत.
काय आहेत पॅकेज : केंद्र सरकारच्या भारतीय रेल्वेची इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीकडून रेल्वेमधील खानपान सेवा, तिकीट विक्री तसेच रेल्वे संबंधित पर्यटन इत्यादी विभाग सांभाळते. या कंपनीकडून देशभरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी भेटी देण्यासाठी विविध २१ पॅकेज देण्यात आहेत. ज्यामध्ये ३२४० रुपयांपासून ८० हजारापर्यंत पॅकेज उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबईसह महाराष्ट्रामधील विविध ठिकाणाहून ही पॅकेज उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ट्रेन, विमान, हॉटेलमध्ये राहणे, खाण्याची सोय, इन्शुरन्स आदी सुविधा या पॅकेजमध्ये देण्यात येतात. आयआरसीटीसीच्या पॅकेजमधील चार धाम, बुद्धिस्ट धार्मिक स्थळे तसेच तिरुपती येथे जाण्यासाठी असलेल्या पॅकेजला मोठ्ठया प्रमाणात मागणी आहे. या कंपनीच्या (https://www.irctctourism.com/tourpacakage_search?searchKey=&tagType=&travelType=Domestic§or=All) वेबसाईटवर जाऊन आपण आपल्याला आवडीचे असे पॅकेज निवडू शकता अशी माहिती आय. आर.सी.टी.सी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.