मुंबई - दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद मिलिंद देवरा यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. मात्र देवरा यांच्या अर्जला लागणारी अनामत रक्कम ही मुंबईतील एका गिरणी कामगार कुटुंबातील मुलीने आणि एका छोट्या व्यापाराने भरली. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे त्रस्त झालो असून त्यातून सुटका व्हावी आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गिरणी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून वैजयंती गावडे यांनी तर, छोटे व्यापारी नवीन चाडवा यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये इतकी अनामत रक्कम देवरा यांना दिली. केंद्र सरकारने आणलेल्या जीएसटीमुळे देशातील छोटे व्यापारी उद्धवस्त झाले. सिम्बॉयसिसमधून मार्केटिंगची पदवी घेऊन सुद्धा बेरोजगार राहिलो असल्याचे जिगल चाढवा यांनी सांगितले. वैजयंती गावडे म्हणाल्या, गिरणी कामगार यांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत, यासाठी मिलिंद देवरा यांनी प्रश्न सोडवले व १२ हजार लोकांना घराचा एक लॉट मिळाला, परंतु इतर २४ हजार लोकांना गेल्या पाच वर्षात एकही घर मिळाले नाही त्यामुळे गिरणी कामगारांचा मिलिंद देवरा यांना पाठिंबा असल्याचे सांगितले. २०१४ साली आम्ही व्यापारी वर्गाने स्वार्थापोटी भाजपला पाठिंबा दिला होता, परंतु जीएसटीमुळे मस्जिद बंदर येथील व्यापाऱ्यांचे विभाजन झाले, त्यामुळे छोटे व्यापारी पूर्णपणे अडचणीत सापडले, असल्याचे छाडवा यांनी सांगितले. दरम्यान, दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी सर्वांचे आभार मानत आपण मुंबईतील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी मैदानात उतरलो असल्याचे सांगितले.
नोटबंदीमुळे सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे खूप नुकसान आहे. छोटे व्यापारी अडचणीत आहेत. काँग्रेसच्या न्याय योजनेमुळे देशातील गरीब परिवार यांना सन्मानाने जगता येणार आहे. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत त्यामुळे आता मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना आता आपला हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी देवरा यांच्यासह काँग्रेस नेते भाई जगताप, राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर, अमीन पटेल आदी उपस्थित होते.