मुंबई - कोरोनोवर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या स्थलांतरीत कामगारांचे हाल होत आहे. या काळात काही स्थलांतरीत कामगारांनी पायीच तर काहींनी वाहनाची व्यवस्था करत आपल्या घराची वाट धरली आहे. तसेच सरकारने मजुरांना श्रमिक रेल्वेनेही घरी पाठवले आहे. मात्र, पहिल्यांदा मजूरांना विमानाने घरी पाठवण्यात आले आहे.
बंगळुरु येथील नॅशनल लॉ स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात मुंबईत अडकलेल्या तब्बल 180 मजुरांना एअर एशियाच्या विमानाने त्यांच्या रांची येथील घरी पाठवले आहे. लॉकडाऊन काळात चौफेर बाजूनी संकटाचा सामना करणाऱ्या या मजुरांना मदत करण्यासाठी नॅशनल लॉ स्कुल च्या काही विद्यार्थ्यांनी एकत्र येत जवळपास 11 लाख रुपयांची रक्कम उभी केली.
महाराष्ट्र शासन व झारखंडाच्या प्रशासनसोबत समन्वय साधित 180 स्थलांतरीत मजुरांची रवानगी करण्यात आली आहे. यामधील काही जणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देत म्हटले की, जी रक्कम आम्ही विमान प्रवासासाठी गोळा केली तेवढ्याच खर्चात या मजुरांना रस्त्याच्या मार्गाने पाठविताना खर्च येणार होता. मात्र, हाच खर्च विमान प्रवासात करून आम्ही मजुरांचा प्रवासाचा त्रास व वेळ वाचविण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतून दररोज 25 विमानांचे उड्डाण व तेवढेच आगमन होणार असल्याचा फायदा लाॉकडाऊन काळात मजुरांना व्हावा, म्हणून हा प्रयत्न करण्यात आला आहे. मजुरांना मुंबई-दिल्ली रांची अशा मार्गाने गुरुवारी पहाटे 2 च्या दरम्यान पाठविण्यात आले आहे. मोठ्या संख्येने आज मजूर विमानाने आपल्या घरी परतत होते. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. झारखंडमधील मजूर विमानाने राज्यात परत येत आहेत. ही आनंदाची बाब आहे, असे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले.