मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला अतिशय छोटी सभा अशा शब्दात हिणवले गेले. बीकेसीच्या एका छोट्या मैदानावर ही सहभाग घेतली, असा टोला देखील भाजपकडून लगावण्यात आला. या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, इतका जळफाट चांगला नाही. राजकारणात विरोधक सुद्धा ताकदीचे असतात. जितकी गर्दी मैदानात होती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी बाहेर बीकेसी परिसरात होती. जर या सभेला कोणी छोटी सभा म्हणत असेल तर त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन करून घेण्यासाठी आम्ही एखाद्या नेत्र चिकित्सा शिबिर लावू आणि मोफत शस्त्रक्रिया करून देऊ. कालची सभा बघून बीजेपीच्या लोकांनी मुक्त बैठक घेतली असेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढची दहा वर्ष घेऊ नये असा ठराव पास केला असेल.
आम्ही न्हावी पाठवतो : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र आणि देशात सत्ता परिवर्तनाच्या दिशेने पावले पडत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हे भारतीय जनता पक्षाच्या आणि सरकारच्या पूर्णपणे विरोधातले आहेत. काही गद्दारांनी घोषणा केल्या होत्या जर हरलो तर मिशा काढू त्यांनी मिशा काढल्या का आता बघायला हवे. नाही तर आम्ही न्हावी पाठवतो हजामत करायला. असा खोचक टोला खासदार राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे 6 तारखेला बारसुच्या दौऱ्यावर : कोकणातील बारसु रिफायनरी बाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे 6 मे रोजी कोकणात जात आहेत. ते सकाळी बारसू येथे पोहोचतील. रिफायनरी विरोधक भूमिपुत्रांशी भेटून ते चर्चा करतील. त्यानंतर महाड येथे सभेसाठी ते जातील. या दोन्ही सभा कोकणात आहेत. काही लोक म्हणतात कोकणात येऊ देणार नाही. आम्ही सुद्धा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकणातली जनता शिवसेना पक्षप्रमुखांचे स्वागत करेल. महाडच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे.
मॉरिशसवरून विमान पाठवलं का? : बारसुमध्ये जे लोक आंदोलन करत आहेत त्यांच्या प्रमुखांचे आम्ही प्रोफाइल चेक केले. हे सर्व लोक बाहेरचे आहेत. स्थानिक नाहीत. असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांना उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, "जेव्हा जेव्हा शेतकरी आणि कष्टकरी यांवर अन्याय होतो तेव्हा तेव्हा सर्व शेतकरी आणि कष्टकरी एकत्र होतात. दिल्लीला शेतकऱ्यांच आंदोलन झाले तेव्हा संपूर्ण देशातून आणि महाराष्ट्रातून देखील शेतकरी गेले. देवेंद्र फडणवीस काय सांगतात बाहेरचे होते. पाकिस्तान, म्यानमार, सुदान, सीरिया इथले लोक होते का? की परवा मॉरिशसला जाऊन आले तिथून एक विमान पाठवलं त्यांनी? स्थानिक लोक होते. परप्रांतीय जमीनदारांचे जमिनीचे भाव खाली जाऊ नये म्हणून तुम्ही आमच्या स्थानिकांवर अन्याय करत आहात. सगळे स्थानिक आहेत. एका सौदी अरेबियाच्या म्हणजेच इस्लामिक राष्ट्राच्या प्रिन्सचा तो कारखाना आहे. त्याची गुंतवणूक तिकडे होत आहे. त्यातून काही लोकांना दलाली मिळणार आहे. किक बॅक मिळणार आहे. जे या रिफायनरीचे समर्थन करत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात खोके गेले आहेत. किक बॅक मिळाले आहेत.
हेही वाचा : Nashik News: ट्रकमधून बकऱ्या फेकण्याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी 'त्या' अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल