मुंबई: मुंबईतील वाढती लोकसंख्या पाहता एमयूटीपी (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट) नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या एमयूटीपी ३ अ प्रकल्पासाठी तातडीने १०० कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात यावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्राकडून निधी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने खेद व्यक्त केला जात होता. परंतु आता शिंदे - फडणवीस सरकारने या प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे.
विकास कामे वेळेत आणि वेगाने पूर्ण होणार?: रेल्वे मंडळाने या प्रकल्पासाठी ३५० कोटींचा निधी दिलेला आहे. मात्र राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने रेल्वे मंडळांनी अतिरिक्त निधी देण्यास आपला हात आखडता घेतला होता. परंतु आता यासाठी १०० कोटी तातडीने देण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला केल्याने या प्रकल्पाला गती येणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, लोकांसाठी हे प्रकल्प अतिशय फायदेशीर ठरणार आहे. यापूर्वीच हे प्रकल्प वेगाने वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे आता या प्रकल्पाला कालबद्ध पद्धतीने वेग दिला जाणार आहे. वित्त पुरवठा, करार या बाबींची कार्रवाई लवकर करण्यात यावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. विकास कामे वेळेत आणि वेगाने पूर्ण झाली पाहिजेत यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे लागेल, असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले आहेत.
राज्यांकडून निधी भेटत नसल्याने खंत : एमयूटीपी ३ अ प्रकल्पसंचाला केंद्रीय मंजुरी भेटल्यानंतर राज्य सरकारकडून निधी भेटत नव्हता व हा निधी भेटण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा होत होते. आता हा निधी लवकरच दिला जाणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी अधिक निधीची आवश्यकता भासल्यास एमएमआरडीएला आर्थिक वाटा उचलता यावा यासाठी कर्जाची व्याप्ती ही वाढवली जाईल. तसे बघता यंदाच्या आर्थिक वर्षात एमयूटीपी २ आणि एमयूटीपी ३ यासाठी एकंदरीत ७७८ कोटींचा निधी राज्य सरकारच्या सूचनेनुसार सिडको आणि एमएमआरडीएने एमआरव्हीसीला दिला आहे. तर बोरिवली - विरार पाचवी व सहावी मार्गिका (२६ किमी), त्याचबरोबर गोरेगाव - बोरिवली हार्बर मार्गिकेचा विस्तार (७ किमी), कल्याण - बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका (१५ किमी) कल्याण - आसनगाव चौथी मार्गिका (३२ किमी) या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच मध्य रेल्वेवरील १० व पश्चिम रेल्वे वरील ८ अशा एकूण १८ स्थानकांसाठी स्थानक सुधारणा हा प्रकल्प देखील याच एमयूटीपी ३ अ अंतर्गत येत आहे.
एमयूटीपी टप्पा १ व २ यशस्वी: यापूर्वी एमयूटीपी १ मध्ये ९ वरून १२ डब्यांच्या उपनगरीय गाड्या सुरू करण्यात आल्या. तसेच बोरिवली - विरार आणि कुर्ला- ठाणे या जादा मार्गिका सुद्धा सुरू करण्यात आल्या आहे. एमयूटीपी २ मध्ये सर्व डीसी गाड्यांचे एसीमध्ये परिवर्तन करण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. त्याचबरोबर ठाणे आणि दिव्या दरम्यान पाचवी, सहावी मार्गिकाही सुरू करण्यात आली.
सध्याची एमयूटीपी ३ मधील प्रकल्पांची स्थिती: कळवा - ऐरोली उन्नत मार्गीका खर्च ४७६ कोटी सद्यस्थिती ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा - दिघा स्थानक सद्यस्थिती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. दुसरा टप्पा - कळवा ऐरोली उन्नत मार्ग भूसंपादन रखडले आहे. तर पनवेल - कर्जत नवीन उपनगरी मार्ग, २७८२ कोटी आहे. सद्यस्थिती ३९ टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वेरूळ अपघात नियंत्रण खर्च ५५१ कोटी असून ५७ टक्के काम पूर्ण झाले आहे.
हेही वाचा: Rewa Express पहिल्यांदाच इतवारी रिवा एक्सप्रेसला भंडारा रेल्वे स्थानकावर थांबा