मुंबई - राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलने नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेतल्या होत्या. या १० सामायिक प्रवेश परीक्षांचे निकाल काल (शुक्रवारी) जाहीर करण्यात आले. यामध्ये १ लाख ४० हजार ९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मराठा आरक्षण वगळून होणार प्रवेश -
सीईटी सेलकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठी आवश्यक असलेल्या सामायिक परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षण वगळून प्रवेश प्रक्रिया घेण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी सीईटीचे निकाल जाहीर केल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.
रात्री उशीरापर्यंत सुरू होती प्रक्रिया -
सीईटीसेलने राज्यातील उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या आठ परीक्षांपैकी सहा परीक्षांचे निकाल जाहीर केले. तर, तंत्र शिक्षणाच्या अखत्यारित असलेल्या पाच पैकी चार सीईटींचे निकाल जाहीर झाले आहेत. संकेतस्थळावर रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होती. सीईटी सेलकडून लवकरच उर्वरित परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
डिसेंबरमध्ये सुरू होणार शैक्षणिक वर्ष -
सीईटीच्या या निकालानंतर प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. प्रवेशासाठी डिसेंबर महिन्यातील १५ दिवस घेतले जातील. त्यानंतर शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आपल्या प्रवेश प्रक्रियेसाठी धावपळ करावी लागणार आहे.
निकाल जाहीर झालेल्या परिक्षा -
सीईटी | परीक्षेची तारीख | उत्तीर्ण विद्यार्थी |
एमसीए | २८ ऑक्टोबर | १ लाख १० हजार ६३१ |
एम. आर्च | २७ ऑक्टोबर | ९६७ |
बीएचएमसीटी | १० ऑक्टोबर | ११०८ |
एमएचएमसीटी | २७ ऑक्टोबर | २३ |
विधी (५ वर्ष) | ११ ऑक्टोबर | १६ हजार ३४९ |
बीएस्सी/बीए बीएड | १८ ऑक्टोबर | १ हजार २१२ |
बीएड, एमएड | २७ ऑक्टोबर | ९८३ |
एमपीएड | २९ ऑक्टोबर | १ हजार ५८१ |
बीपीएड | ४ नोव्हेंबर | ५ हजार ८११ |
एमएड | ५ नोव्हेंबर | २ हजार १५७ |