मुंबई 2024 Lok Sabha Elections: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी भाजपाने कंबर कसलीय. महाराष्ट्रात मिशन 45 अंतर्गत भाजपा जोरात तयारीला लागलाय. अशात भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झालीय. मुंबईतून धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या नावाची चर्चाही जोरात सुरू आहे. विशेष करून दोन दिवसांपूर्वी गणपती दर्शनासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान मुंबईतून अभिनेत्री माधुरी दीक्षित तसंच जळगावमधून प्रसिद्ध वकील उज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दिघावकर व पुण्यामधून सुनील देवधर यांना तिकीट देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
माधुरी दीक्षित यांच्या नावावर चर्चा : दोन दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मुंबई, पुणे, धुळे आणि जळगाव लोकसभा मतदार संघाबाबत या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. या मतदारसंघात विजयाची खात्री असलेले उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली. विशेष म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना मुंबईतून कुठल्या लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाऊ शकतं, याबाबत चाचपणी करण्यासोबत माधुरी दीक्षित यांनाही विचारणा करण्यात येणार आहे.
चारही नावावर चर्चा : या दरम्यान झालेल्या चर्चेत भाजपाकडून मुंबईतून अभिनेत्री माधुरी दीक्षित, जळगावमधून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, पुण्यातून सुनील देवधर आणि धुळ्यातून प्रतापराव दीघावकर यांना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. या सर्वांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली जाणार आहे, तरी पक्षानं यापूर्वी सुद्धा त्यांच्या विचार केला होता, असे सांगण्यात येतंय. तसेच ते सुद्धा निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत की नाही हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. दरम्यान, या चारही नावावर झालेल्या चर्चेबाबत भाजपाकडून कुणीही बोलण्यास तयार नाहीय.
अमित शाहंसोबतची बैठक गुलदस्त्यात : अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भाजपकडून मुंबईतून माधुरी दीक्षित, जळगावमधून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, पुण्यातून सुनील देवधर आणि धुळ्यातून प्रतापराव दीघावकर यांना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. तसेच या सर्वांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. ते निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत की नाही, हे पाहिलं जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान, या चारही नावावर झालेल्या चर्चेबाबत भाजपाकडून कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही, तरी शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं हे सुद्धा गुलदस्त्यातच आहे.
कुणाचा पत्ता होणार कट : मुंबईत एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहे. त्यापैकी ठाकरे गटाकडे 1, शिंदे गटाकडे 2 आणि भाजपाकडे 3 खासदार आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे मुंबईतील एकमेव खासदार आहेत. तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे राहुल शेवाळे व उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर हे 2 खासदार आहेत. तसेच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मनोज कोटक, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे गोपाळ शेट्टी, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन हे एकूण 3 खासदार आहेत. आता अशा परिस्थितीत भाजपा माधुरी दीक्षित यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी देणार? आणि त्यासाठी कुणाचा पत्ता कट करणार याकडेसुद्धा सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मतदार संघावर परिणाम : या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे नेते राजेश शर्मा म्हणाले की, फिल्म अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी मुंबईतील कुठल्याही लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवली, तरीही त्याचा काही परिणाम आमच्यावर होणार नाही. वास्तविक माधुरी दीक्षित या जिथून निवडणूक लढवतील त्या मतदारसंघांमध्ये माधुरी दीक्षित दुसऱ्या क्रमांकावर राहू शकतील, पण त्यांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय होणार नाही. याचं कारण म्हणजे माधुरी दीक्षित या पूर्णतः प्रोफेशनल अभिनेत्री आहे. बारा महिन्यातून नऊ महिने त्यांचं वास्तव्य अमेरिकेला असतं. दुसरीकडे मुंबईच्या सहा मतदार संघामध्ये मराठी टक्का मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मराठी मतदारांची मतही प्राधान्यानं शिवसेनेला जातात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे.
ड्रीमगर्ल हेमामालिनी भाजपाच्या खासदार : शर्मा पुढे म्हणाले की, एकीकडे धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिचा भाजपाकडून लोकसभेसाठी विचार होतोय. दुसरीकडे ड्रीमगर्ल हेमामालिनी या अनेक वर्षांपासून भाजपाच्या खासदार आहेत. परंतु ज्या मथुरा या लोकसभा मतदारसंघातून त्या येतात, तेथे हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रकर्षाने जाणवतो. महत्त्वाचं म्हणजे हेमामालिनी यांच हिंदुत्वाशी फार पूर्वीपासूनच नातं असल्याकारणानं त्या निवडून येतात. परंतु तीच बाब माधुरी दीक्षित यांच्याबाबत लागू होणार नाही. दुसरीकडे प्रताप दिघावकर असतील, उज्वल निकम असतील सुनील देवधर असतील या प्रसिद्ध लोकांना जर भाजपाला खरोखरच न्याय द्यायचा असेल, तर भाजपानं त्यांना राज्यसभेवर उमेदवारी द्यावी असंही राजेश शर्मा यांनी सांगितलंय.
हेही वाचा :