नवी मुंबई - सिडकोच्या माध्यमातून आगार प्रवेश छन्नमार्गावर आणि तळोजा आगारातील चाचणी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी एकूण 850 मीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो धावली. सुरक्षिततेच्या कारणास्तव मेट्रोचा वेग कमी ठेवून तो 65 कि.मी. प्रती तास इतका राखण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांकडून, शासनाने जारी केलेल्या कोविड-19 विषयक सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग -
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत. या उद्देशाने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. तळोजा आगार येथील आगार प्रवेश छन्नमार्गावर (ॲप्रोच व्हायडक्ट) मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना -
सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 च्या जलद अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यानुसार महा मेट्रोकडून 23 फेब्रुवारी 2021 रोजी प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात आली आहे.
डिसेंबर 2022 अखेरीस प्रवासी वाहतुकीस सुरुवात होणार -
आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएआरएस) यांचे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मार्ग क्र. 1 वरील स्थानक 7 ते 11 दरम्यान आणि स्थानक 1 ते 7 दरम्यान साधारणत: डिसेंबर 2022 अखेरीस प्रवासी वाहतुकीस सुरुवात होणार आहे. सदर मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे. असे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - मराठा नोकरभरतीसंदर्भात छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र