मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1च्या वाहतुकीला आज सकाळी-सकाळी थोडा ब्रेक लागला. वर्सोव्याकडून घाटकोपरच्या दिशेने निघालेल्या मेट्रो गाडीत सकाळी 9.47 वाजता काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने गाडी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्थानकावर थांबली. त्यामुळे मेट्रो 1च्या वाहतुकीचा सकाळी-सकाळी खोळंबा झाला. पण मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्वरित ही तांत्रिक समस्या दूर करत वाहतूक 15 मिनिटांत सुरळीत केल्याची माहिती एमएमओपीएलच्या प्रवक्त्याने 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे.
एका महिन्यात आठ लाख मुंबईकरांनी केला मेट्रो 1 ने प्रवास
कोरोना-लॉकडाऊनमुळे मुंबईची तिसरी लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मेट्रो 1 अर्थात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्ग 22 मार्चपासून बंद होता. पण 19 ऑक्टोबरपासून मेट्रो 1 राज्य सरकारच्या आदेशानुसार ट्रॅकवर आली आहे. तर उद्या मेट्रो 1 सुरू होऊन एक महिना होत असताना आजपर्यंत या महिन्याभराच्या काळात तब्बल आठ लाख मुंबईकरांनी मेट्रो 1 ने प्रवास केल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. फेऱ्या कमी असताना आणि 50 टक्के कमी क्षमतेने मेट्रो 1 धावत असताना हा आकडा समाधानकारक असल्याचे एमएमओपीएलकडून म्हटले जात आहे.
सात महिने मेट्रो 1 ट्रॅकवर
मुंबईत 350 हुन अधिक किमी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. पण सद्या मुंबईत एकमेव 11.5 किमीचा मेट्रो 1, वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्ग सेवेत दाखल असून इतर मार्गाची मुंबईकरांना प्रतिक्षाच आहे. असे असले तरी मेट्रो 1 मात्र मुंबईकरांना फायद्याची ठरत असल्याने या मार्गाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. दिवसाला साडे चार लाख प्रवाशी या एका मार्गाचा वापर करतात. पण कॊरोना-लॉकडाऊनमुळे मागील सात महिन्यापासून मेट्रो 1 कारशेडमध्ये होती. अनलॉक सुरू झाल्यानंतर मेट्रो 1 कधी सुरू होणार असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात होता. अखेर राज्य सरकारने 15 ऑक्टोबरला याचे उत्तर दिले. मेट्रो सुरू करण्यास हिरवा कंदील दिला. त्यांच्या या आदेशानुसार कॊरोनाच्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करत मेट्रो 1 ऑक्टोबर 19 ला वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली. लोकल केवळ काही ठरविक घटकासाठी असताना मेट्रो 1 मधून मात्र सर्वांना प्रवास करता येत असल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - आरपीएफ जवानाने वाचवले धावत्या रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेचे प्राण, घटना सीसीटीव्हीत कैद
पहिल्या आठवड्यात अत्यल्प प्रतिसाद
19 ऑक्टोबरपासून मेट्रो 1 सुरू झाली खरी पण पहिल्या आठवड्यात मेट्रोला खूपच कमी प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी अंदाजे 13 हजार प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला. तर आठवड्याभरात हा आकडा कमीच राहिला. तर पहिल्या दहा दिवसात दोन लाख प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला. तर आता महिन्याभरात अर्थात 28 दिवसात हा आकडा 8 लाख झाला आहे. पण हा आकडा समाधानकारक असल्याचे एमएमओपीएलचे म्हणणे आहे. कारण सध्या 50 टक्के प्रवाशी क्षमतेने मेट्रो 1 धावत असून फेऱ्या ही कमी आहेत. लोकडाऊन आधी दररोज पहिली मेट्रो पहाटे साडे पाचला सुटत होती. तर शेवटची मेट्रो गाडी रात्री साडे अकराला सुटत होती. पण आता मात्र पहिली मेट्रो सकाळी साडे आठला तर शेवटची मेट्रो गाडी रात्री साडे आठला सुटते. तसेच 400 ऐवजी 200 फेऱ्या होत आहे. त्यामुळे कमी प्रवासी संख्या दिसत असल्याचे एमएमओपीएलचे म्हणणे आहे. असे असले तरी दिवसा रोज साडे चार लाख प्रवासी मेट्रो 1 ने या आधी प्रवास करत होते तिथे 28 दिवसात केवळ 8 लाख प्रवासी या आकडा खूपच कमी असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान फेऱ्या आणि मेट्रोची वेळ ही लोकल पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतरच वाढवल्या जातील असा पुनरुच्चार ही एमएमओपीएलने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.
हेही वाचा - शिवरायांचा भगवा थेट जर्मनीत; चिमुरडीने किल्ला बनवून दिवाळी केली साजरी