मुंबई : घाटकोपर परिसरात घडलेल्या घटनेने घबराहाट पसरली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वायरल केल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी दुपारी पीडित मुलीच्या वडिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यानंतर अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी डोंगरीतील बाल सुधार गृहात केली आहे.
हकीकत अशी आहे : पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, मी रिक्षा चालवतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पनातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. पीडित मुलगी पायाने अपंग आहे. ती घरीच असते. तिला बोलता देखील येत नाही. 13 जानेवारीला रात्री 10 वाजेचे सुमारास पीडितेचे वडील हे रिक्षा अंधेरी येथून खारघर नवी मुंबई येथे घेवून जाताना त्यांच्या मित्राने त्यांना घटनेबद्दल माहिती दिली.
बाथरुमध्ये ओढले आणि चापट मारली : घराजवळील सार्वजनिक शौचालयात त्यांची मुलगी शौचालयासाठी गेली असता. तिला परिसरातील तीन मुलांनी बाथरुममध्ये हात धरून ओढत नेले. परिसरातील काही लोकांनी त्या मुलांना पकडून ठेवले होते. ही माहिती कळाल्यानंतर वडिलांनी अंधेरीला घेऊन जात असलेली रिक्षा पवईत उभी केली, आणि घरी आले. मुलीला समजेल अशा भाषेत विचारले असता तिने हातवारे करून सांगितले की, तीन मुलांनी बाथरुमध्ये ओढले आणि चापट मारली.
तिघेही अल्पवयीन : पिडितेचे वडील मुलांना समजावण्यास गेले असता त्यांच्या आई-वडीलांनी मुलांना मारण्यास सुरुवात केली. मुलांना माफ करा, त्यांच्याकडून चूक झाली ते शाळेत शिक्षण घेत आहेत, असे पालक म्हणाले. त्या मुलांना माफी मागायला लावली. तिन्ही मुले अल्पवयीन आहेत. 14, 15, 17 वर्षाची ही मुले आहेत. ही मुले पीडित मुलीच्या परिसरातील असल्यामुळे तसेच मुलीने तिच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार काही घडला नाही असे सांगितल्यामुळे त्या दिवशी वडिल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले नाही. त्यानंतर मुलीची प्रकृती ठिक नसल्यामुळे तिला दवाखान्यात नेवून उपचार करुन तिच्यासह घरी आले.
अश्लिल कृत्य करतानाचा व्हिडिओ वायरल : 19 जानेवारीला रात्री दहा वाजताच्या सुमारास वडील कामावरुन परत घरी आले. जेवणकरुन घरामध्ये झोपले असता, पीडितेचा भाऊ वडिलांजवळ गेला आणि रडायला लागला. वडिलांनी त्याला विचारले तेव्हा त्याने व्हिडीओ दाखवला. लहान बहिणीसोबत बाथरूममध्ये तिघांपैकी एका मुलाने वाईट कृत्य करतानाचा तो व्हिडिओ होतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी घाटकोपर पोलीस ठाणे गाठले आणि तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.