मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल न देता काही महत्वपूर्ण निरीक्षणे महाराष्ट्रातील ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षासंदर्भात नोंदली. राज्यातील या सत्तासंघर्षात राज्यपाल, निवडणूक आयोगासह महत्वाच्या घटकांनी घेतलेल्या निर्णयांवर कडक ताशेरे ओढले आहेत. त्याचवेळी कोणताही निर्णय न दिल्याने सरकारला सध्या तरी कायदेशीरदृष्ट्या कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नंतर ज्या काही घटना घडल्या, त्याबाबत कोर्टाला आताच काही निर्णय देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या एकूणच परिस्थितीत ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा समाज माध्यांच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. त्यातील काही मासलेवाईक प्रतिक्रिया आपण येथे पाहणार आहोत.
या मीम्समध्ये सध्या गाजत असलेले एक मीम म्हणजे, 'शिंदे क्लिन बोल्ड, पण ठाकरेंचा नो बॉल' हे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याच्या कृतीवर बोट ठेवणारे हे मीम खूपच गाजत आहे. कारण कोर्टाने शिंदे गटासंदर्भात अनेक धक्कादायक निरीक्षणे नोंदवली. त्यामध्ये त्यांची स्वतःची गटनेतेपदी स्वतःच केलेली नियुक्ती, पक्षप्रतोदपदी केलेली भरत गोगावले यांची नियुक्ती, राज्यपालांचा बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलावण्याचा निर्णय या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडल्या असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी अवसानघातकी निर्णय घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने त्यांचा हाच निर्णय 'नो बॉल' ठरवत नेमके वर्मावर बोट ठेवणारे हे मीम परिस्थितीला चांगलेच चपखलपणे बसणारे असल्याने गाजत आहे.
याचबरोबर कोर्टाच्या निरीक्षणांच्या अनुषंगाने आणखी एक मीम सध्या सोशल मीडियावर खूपच गाजत आहे. त्यामध्ये खालील मीमने सोशल मिडीयावर चौफेर फटकेबाजी सुरू केल्याचे दिसत आहे.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर.
एकमेकांची पसंती बेकायदेशीर.
साखरपुडा बेकायदेशीर.
लग्न बेकायदेशीर.
हनिमून बेकायदेशीर.
पण झालेलं बाळ मात्र कायदेशीर.
याच धर्तीवर वरील मुद्याला जोडून आणखी एक मीम सोशल मीडियावर गाजत आहे ते पुढीलप्रमाणे...
लग्न लावणारा भटजी सुद्धा बेकायदेशीर, लग्नाला मुलीला आणणाऱ्या मामासुद्धा बेकायदेशीर!
कोणतीही गोष्ट घडल्यानंतर सेलिब्रेशन करण्याची अलिकडे पद्धत आहे. त्यातूनच आणखी एक मीम चर्चेत आले आहे. ते खालीलप्रमाणे
निकाल आज आहे म्हणून ज्यांनी कालच आपापले ब्रँड आणले असतील त्यांना आता कळेना की आनंदात प्यावी की दुःखात... निर्णय असा दिलाय की दोन्ही बाजूची लोकं नेमकं काय झालं म्हणून डोसकं बडवत आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वकील विश्वंभर चौधरी यांनीही उपरोधिक भाष्य करत मार्मिक टिप्पणी केली आहे. ते म्हणतात...
इमारत पूर्णतः बेकायदा आहे, मालक बेकायदा आहे, आर्किटेक्ट बेकायदा, बांधणाऱ्यांनी ते बेकायदा बांधलंय.....
पण पाडायची की नाही ते बांधणारे ठरवतील!
विश्वंभर चौधरी
सुहास्य वदनाने फडणवीस निकालाचं स्वागत करत आहेत, आम्ही जिंकलो एवढेच त्यांचे म्हणणे आहे.
सुप्रीम कोर्टाने काळा रंग चढवला सगळ्यांच्या चेहऱ्यावर, तरी त्याची कोणतीही खंत चेहऱ्यावर न ठेवता हे बोलणं सोप्प नाही.
विश्वंभर चौधरी
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
याचबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही त्यांच्या फेसबुक पेजवर एकाच ओळीत आजच्या निरीक्षणांच्यासंदर्भात पोस्ट शेअर करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अंधारे म्हणतात की 'ऑपरेशन इज सक्सेसफुल, बट पेशंट इज डेड'