मुंबई - फरार भारतीय हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला डॉमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले आहे, असे वृत्त तेथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिले आहे. मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. तो अँटिग्वामधून क्युबा येथे पळून गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
"मेहुल चोक्सी अँटिग्वाचा नागरिक"
मेहुल चोक्सी हा अँटिग्वाचा नागरिक असल्याचा त्याच्या वकिलांनी दावा केला आहे. तो अँटिग्वाचा नागरिक असल्याने तिथे मिळणारे सर्व हक्क त्याच्याकडे आहेत. अँटिग्वा एक कॅरिबियन देश आहे. ज्या देशात मेहुल चोक्सीला अटक केली गेली, तो अँटिग्वाच्या आसपासच्या भागातच येतो. परंतु मेहुल चोक्सी डॉमिनिकाला का गेला? हे अद्याप अस्पष्ट आहे.
तर, 'मी मेहुल चोक्सींच्या कुटुंबाशी बोललो आहे. त्यांचा पत्ता आता कळला आहे. याबद्दल त्यांच्या घरच्यांना आनंद झाला आहे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून त्यांना डॉमिनिका येथे कसे नेले गेले? हे स्पष्ट चित्र समजू शकेल', असे मेहुलचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले आहे.
चोक्सीकडून पीएनबीला 13,500 कोटींचा गंडा
चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआय त्याच्या विरोधात चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीची 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे.
दरम्यान, डॉमिनिका येथील पोलीस आता चोक्सीला अँटिग्वाचा पोलिसांच्या स्वाधीन करण्याची तयारी करीत असल्याचे समजते आहे.
हेही वाचा - देवा, आता तूच वाचव! कोरोनामुक्तीसाठी दंडवत घालत देवांना आजोबांचे साकडे