मुंबई - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात अधिक लोकांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विरोधात लढण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आयआयटी माजी विद्यार्थी परिषदेने गुरुवारी एक महत्त्वाची घोषणा केली. मुंबईत दरमहा 1 कोटी लोकांची चाचणी क्षमता असलेली मेगालॅब सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोबतच यासाठी लवकरच जागतिक स्पर्धेद्वारे भागीदारांची निवड करणे सुरू करणार असल्याचेही परिषदेने म्हटले आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच शहरात पहिली 'कोविड टेस्ट बस' सुरू केल्यानंतर मेगापोलिसमधील दोन सुपर कॉम्प्यूटर क्लस्टरवर चाचण्याही सुरू झाल्या आहेत, असेही परिषदेने म्हटले आहे.
कोरोनावर लस उपलब्ध होण्यास अजून अंदाजे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. अशात चाचणी क्षमता वाढवणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे, सध्या या लॅबचे लक्ष वेळेवर तपासणी करुन रुग्णांना योग्य ते आणि परवडणाऱ्या खर्चात उपचार देणे हे आहे.
आयआयटी माजी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष रवी शर्मा यांनी सांगितले की, या परिषदेने दरमहा १० दशलक्ष आरटी-पीसीआर चाचणी क्षमता असलेल्या मेगलॅबच्या डिझाईनचे मुंबईमधील काम सुरू केले आहे. जगभरात एक हजार माजी आयआयटी विद्यार्थ्यांसह अनेक गट कोरोनासोबत लढण्यासाठी योग्य उपाय शोधत आहेत. आयआयटी माजी विद्यार्थी परिषद विद्यार्थी आणि शिक्षकांची सर्वात मोठी जागतिक संस्था आहे.