मुंबई - राज्यात सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. एकूण १७ जागांवर ही मतदान प्रकिया पार पडणार आहे. यामध्ये काही मुख्य लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मावळ, शिरुर, शिर्डी, धुळे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, केंद्रीय गृहराज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, पुनम महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
लक्षवेधी लढती
मावळ-
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे. तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यामान खासदार श्रीरंग बारणे यांचे तगडे आव्हान असणार आहे. यामध्ये आता बारणे बाजी मारणार की नवखे पार्थ पवार त्यांना चितपट करत दिल्ली गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिरुर
युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे चौथ्यांदा तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मैदानात उतरले आहे. अमोल कोल्हेंना निवडणुकीच्या रणांगणात उतरवून आढळराव पाटलांसमोर राष्ट्रवादीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. यावेळी आढळराव पाटील चौकार मारणार की अमोल कोल्हे त्यांना क्लिन बोल्ड करत दिल्ली गाठणार हा येणारा काळच ठरवेण.
शिर्डी
यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. यावेळी शिवसेनेकडून विद्यमान सदाशिव लोखंडे तर काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे हे निवडणूक लढवत आहेत. तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे अपक्ष निवडणूक लढवत असल्याने रंगत निर्माण झाली आहे.
धुळे
यावेळी या मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना तर काँग्रेसने कुणाल पाटील यांना मैदानात उतरवले आहे. तर या दोघांसमोर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटेंचे आव्हान असणार आहे.
मुंबई उत्तर
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ हा जोरदार चर्चेत आला आहे. कारण काँग्रसेने येथून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे. तर त्यांच्यासमोर भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे मोठे आव्हान आहे.
मुंबई उत्तर मध्य
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ हा काँग्रसेचा गड मानला जातो. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव करत हा गड काबीज केला. आता पुन्हा एकदा भाजपकडून पूनम महाजन आणि काँग्रेसकडून प्रिया दत्त या आमने-सामने उभ्या आहेत.
मुंबई दक्षिण -
येथून शिवसेनेचे विद्यामान खासदार अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. २१०४ च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरांचा तब्बल सव्वा लाख मतांनी पराभव केला होता.