मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मार्गावर रविवारी 7 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरिल सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गांवर सांताक्रुज ते माटुंगा रोड रेल्वे स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.
मुख्य मार्गावर मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा रेल्वे स्थानका दरम्यान अप-डाऊन धीम्या आणि अप डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान धीम्या व जलद मार्गावरील उपनगरी सेवा रद्द राहणार आहे. तसेच अप व डाऊन उपनगरी सेवा ब्लॉक कालावधीत भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट ओरिजनेट/शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन रेल्वेची सेवा रद्द करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला विभागात विशेष सेवा चालविली जातील. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-पनवेल लोकल सेवा रद्द केली जाणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक -
पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते माटुंगा रोड अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी-रविवारच्या रात्री 12.15 ते पहाटे 04.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये अंधेरी ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.