मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर 8 ऑगस्ट 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार या निर्धारित स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. पुढे डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा गाड्या वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते सायंकाळी ३.५२ पर्यंत सुटणारी अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद या निर्धारित थांब्यांवर थांबणार नाहीत.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप-डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत सीएसएमटीला सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, पनवेल आणि वाशीदरम्यान ब्लॉक कालावधीत विशेष सेवा चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक -
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवारी बोरीवली ते गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅक कालावधीत बोरीवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉकवेळी बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणतीही लोकल चालविण्यात येणार नाही.
हेही वाचा - मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती, सुदैवाने जीवितहानी नाही