मुंबई- मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उपनगरी मार्गावर मेगा ब्लॉक करणार आहे. पश्चिम रेल्वेकडून शनिवारी रात्री ९ पासून रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत मेगाब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या डाउन धिम्या मार्गावरील विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित थांब्यावर थांबतील. अप धिम्या मार्गांवरील विशेष सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यावर थांबतील.
पनवेल-वाशी दरम्यान अप व डाउन मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक असेल अप हार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी १०.३० ते दुपारी ३.३५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या विशेष सेवा बंद राहतील. डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत पनवेलकडे जाणाऱ्या विशेष सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरी रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी विभागात चालविण्यात येतील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत, अस मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
पश्चिम रेल्वेचा शनिवार ब्लॉक तर वसई रोड व विरार स्टेशनच्या दरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणे देखभाल करण्याचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री ९.०० ते रविवारी दुपारी १.०० वाजेपर्यंत वसई रोड ते विरार दरम्यान अप व डाऊन फास्ट मार्गावर मोठा ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या पत्रकातील माहितीनुसार, सर्व मेल / एक्स्प्रेस गाड्या 15 मिनिटांनी उशिरा चालणार आहेत.