मुंबई- गेले अडीच महिने लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली उपनगरीय लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 1 जून पासून सुरू झाली. त्यानंतर प्रथमच मध्य रेल्वे रविवार 28 जूनला विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी मुख्य मार्गावरील उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अप व डाऊन जलद मार्गावर विद्याविहार - मुलुंड दरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक असेल.
सकाळी 10.16 ते दुपारी 2.17 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. सदर गाड्या निर्धारित थांब्यांवर थांबतील त्यानंतर मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.
दुपारी 12.41 ते दुपारी 3.25 या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या जलद विशेष लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या निर्धारित थांब्यांवर थांबविण्यात येतील आणि माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
ठाणे व कल्याणच्या काही लोकल रद्द केल्या जातील. परंतु राज्य शासनाने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी पुरेशा सेवा चालविण्यात येतील.
ब्लॉक कालावधी दरम्यान मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते विद्याविहार दरम्यान 5 व्या व 6 व्या मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बर लाइन
पनवेल- वाशी दरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 04.05 (नेरूळ / बेलापूर-खारकोपर हार्बर लाइनचा समावेश) मार्गावर मेगाब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत.
पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.15 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही. ब्लॉक कालावधीत विशेष लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - मानखुर्द- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या विभागात धावतील.
पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.